पुण्यात शनिवारी रात्री उशिरा बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपली मुलं आता या जगात नाही यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये.
अश्विनी कोस्टाने शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आपल्या घरी फोन केला. मी बाहेर जेवायला जात आहे, असं तिने सांगितलं होतं. त्यानंतर तिच्या फोनवरुन त्यांना दुसरा फोन आला तो तिच्या मृत्यूचा. तिच्याच फोनवरुन तिच्या एका मित्राने तिच्या घरी कॉल केला होता. अश्विनीचा अपघात झाला आहे, ती आता या जगात नाही, असं त्याने सांगितलं, अशी माहिती अश्विनीच्या भावाने सांगितलं. ही बातमी कळताच अश्विनीच्या घरात शोककळा पसरली. आताच काहीवेळापूर्वी लेकीशी बोलला, असं अचानक कसं घडलं हेच त्यांना कळत नव्हतं.
अश्विनीचा भाऊ संप्रीतने सांगितलं की, ‘अश्विनीने पुण्यातूनच शिक्षण घेतलं होतं. चार महिन्यांपूर्वी तिला तिथेच नोकरी लागली होती. त्यामुळे ती पुण्यात शिफ्ट झाली होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. ती माझी लहान बहिण होती, मी आता एकट पडलो आहे. ती वडिलांशी रोज फोनवर बोलायची. तिने सांगितलं होतं की ती पार्टीसाठी बाहेर जात आहे आणि मग ही बातमी आली. तिच्याच मोबाईलवरुन तिच्या मित्राने आम्हाला फोन केला होता’.