मी जीन्स घालणं सोडलं, कारण अमित शहा…; आशिष शेलारांनी सांगितला आठवणीतला किस्सा

मुंबई: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक, सत्ताधाऱ्यांकडून आरोपांच्या फैरी झडत आहेत. टीकेचे बाण सोडले जात आहेत. मुंबईतील सहा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होईल. आर्थिक राजधानीत यश मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. महायुतीनं ३ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर अद्याप ३ जागांवर उमेदवार ठरायचे आहेत. गेल्या निवडणुकीत युतीनं मुंबईत सहापैकी सहा जागा जिंकल्या होत्या. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान आता महायुतीसमोर आहे. मुंबईतील भाजपच्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांवर आहे.

महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याबद्दल विचारलं असता राज यांनी सभा घ्याव्यात ही आमची अपेक्षा आणि मागणी आहे. याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मनसेप्रमुखांशी बोलून घेतील. राज ठाकरे भाजपसाठी सभा घेणार की महायुतीतील अन्य पक्षाच्या उमेदवारांसाठीदेखील सभा गाजवणार, असा प्रश्न विचारला असता राज यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिला असल्याची आठवण शेलारांनी करुन दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
भाजपनं मला तयारी करायला सांगितलंय! नाशकात महंत अनिकेत शास्त्रींची एन्ट्री; तिढा वाढला
तुमच्या पेहरावात बराच फरक पडलाय. त्यामागचं कारण काय, असा प्रश्न शेलारांना विचारण्यात आला. ‘मी आधी जीन्स घालायचो. जाडसर कापडाचा दोन खिसे असलेला शर्ट परिधान करायचो. पण आता मी खादीवर आलोय. खादीची ट्राऊझर आणि खादीचं शर्ट,’ असं शेलार म्हणाले. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांमुळे माझ्या पेहरावात बदल झाल्याचं शेलार म्हणाले.

पुर्नविकासासाठी धारावीकरांना मुलुंडला हलवणार आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं

एकदा मी अमित शहांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला जीन्स घालणं बंद करण्यास सांगितलं. मी का विचारलं. तर मी सांगतोय म्हणून सोड, असं अमितभाई म्हणाले. मी त्यांना यामागचं कारण विचारलं. त्यावर जीन्स घालणं बंद कर. मग डोक्यात चांगले विचार येतील. तुलाही छान वाटेल, असं उत्तर शहांनी दिलं. अमित शहा माझे नेते आहेत. त्यांनी मला खूप प्रेम दिलंय. त्यामुळे मी त्यांचं म्हणणं टाळत नाही, असं शेलारांनी सांगितलं.