पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या बिल्डर वडील विशाल अगरवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. पुण्यातील कल्याणीनगर भागातील या बिल्डरच्या मुलाने शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरील दोन जणांना उडवले होते. त्यात तरुण व तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला न्यायालयात सादर केले असता, तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी बिल्डर विशाल अगरवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच, अगरवाल पुण्यातून फरार झाला होता.
अखेर मंगळवारी पहाटे पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अगरवाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याच्यावर वंदे मातरम संघटनेकडून शाईफेकीचा प्रयत्न झाला.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिपने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला? विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगरमध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला, बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? वरील सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
कारच्या चालकाने जबाब दिला आहे की त्याने गाडी चालवायला मागितली होती पण अल्पवयीन तरुणाने तू शेजारी बस असे सांगितले. कारचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते मग गाडी रस्त्यावर आलीच कशी? असे प्रश्न सरकारी वकिलांनी विचारले.