पुणे पोर्शे कार अपघात: मुलाचा जामीन धक्कादायक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

प्रतिनिधी, पुणे :‘कल्याणीनगर येथील अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील अल्पवयीन कारचालक मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाने घेतलेली भूमिका आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे,’ असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘बाल न्याय मंडळाच्या भूमिकेमुळे नागरिक आणि प्रशासनाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. अपघाताचा प्रकार अतिश गंभीर आहे. याबाबत लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.शहरातील एका बड्या बांधकाम व्यवयायिकाच्या अल्पयवीन मुलाच्या भरधाव आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगर परिसरात घडली होती. त्या प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गृहमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी पुणे पोलिस आयुक्तालयात भेट देऊन आढावा घेतला.
आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता खूप कमी; काय आहे नेमकी पळवाट? महत्त्वाचे ठरणार ‘ते’ १५ तास

फडणवीस म्हणाले, ‘निर्भया प्रकरणानंतर, गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीन आरोपींना तो सज्ञान असल्यासारखे गृहीत धरून त्या नियमावलीप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी बाल न्याय मंडळासमोर पोलिसांनी या अपघात प्रकरणात केली होती. मात्र, बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. त्यामुळे पोलिसांना टिकेचे धनी व्हावे लागले.’

‘एसीपी’ करणार ‘त्या’ प्रकरणाची चौकशी

‘गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात विधीसंघर्षित मुलासह त्याच्या कुटुंबीयांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिल्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या. त्याची दखल घेऊन सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यातील संपूर्ण दिवसाचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले जाणार आहे,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

पोलिसांच्या अर्जावर फेरविचार होणार

अल्पवयीन मुलाला सज्ञान ग्राह्य धरून त्यावर कारवाई करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. मात्र, त्या विषयी फेरविचार करण्याचा अधिकार बाल न्याय मंडळास आहे. त्यामुळे ‘तुम्ही परत त्यांच्याकडे जावा. त्यांनी निर्णय दिला नाही, तर आमच्याकडे अर्ज दाखल करू शकता,’ असे सत्र न्यायालयाने सांगितले आहे. त्यावर बुधवारपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.

पोलिसांनी अपघाताचा प्रकार अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे. मृतांना न्याय मिळेपर्यंत न्यायालयात पोलिस दाद मागतील. सुरुवातीपासूनच याबाबत कठोर भूमिका घेतली असून, पोलिस या प्रकरणाचा अखेरपर्यंत पाठपुरावा करतील.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री