या अपघातात दोन तरुण-तरुणीचा निष्पाप बळी गेला. अश्विनी कोस्ट आणि अनिस आहुदिया अशी या दोघांची नावं आहेत. बड्या बापाच्या मुलाने दोन कुटुंबातील आनंद हिरावून घेतला. आपली मुलं पुण्यात चांगल्या कंपनीत कामाला आहेत हे अभिमानाने सांगणाऱ्या कुटुंबात आज या शेहजाद्यामुळे शोककळा पसरली आहे.
जरा बाहेर जाऊन ये, आईचा सल्ला ऐकून मित्रांसोबत पार्टीला पण…
ही पुण्यात एका आयटी कंपनी मध्ये काम करत होती, दरम्यान तिचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. अपघात होण्यापूर्वी ती तिच्या आईसोबत बोलली, आईने तिला सल्ला दिला वर्क फ्रॉम होमचा त्रास होत असेल तर थोडं रिफ्रेशमेन्ट घे, जरा रिलॅक्स हो. आईचा सल्ला ऐकून शिनिवरी रात्री तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बॉलर पबमध्ये गेली. पबमधून बाहेर आल्यावर ती तिच्या मित्रांसोबत रस्त्याच्या कडेला गप्पा मारत थांबली होती. यानंतर तिला अनिसने तिच्या रूमवर सोडण्यासाठी त्याच्या बाईक वर बसवलं आणि पबचा रस्ता क्रॉस करत असताना हा भयानक अपघात झाला. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. ही बातमी ऐकून तिचे आई-वडील स्तब्ध झाले आहेत. त्यांचा यावर विश्वासच बसत नाहीये की त्यांची मुलगी आता या जगात नाही.
महिनाभरापासून घरचे बोलवत होते, तो नाही मृत्यूची बातमी घरी गेली
अनिस आहुदिया हा रामवाडी मेट्रो स्टेशनजवळ राहत होता. त्याचं शिक्षण पुण्यातच पूर्ण झालं आहे आणि पुण्यात त्याला नोकरी ही लागली. अनिस हा मूळचा उत्तर प्रदेशचा त्याच्या वडिलांचा व्यवसाय आहे. अनिसचे कुटूंब त्याला महिन्याभरापासून घरी भेटण्यासाठी बोलवत होते. परंतु कामामुळे अनिसला घरी जाता आलं नाही. पुण्यात अनिस आणि त्याचा चुलत भाऊ राहतो. अनिसचा चुलत भाऊ हा पिंपरीत शिक्षण घेतो. त्याला या अपघाताची माहिती मिळतचा त्याला मोठा झटका बसला. ही बातमी घरी कळू नये म्हणून त्याने गावाकडील त्याच्या नातेवाईकांना अनिसच्या आई वडिलांचा फोन काढून घेण्यास सांगितलं आणि टीव्हीही बंद करून ठेवायला सांगितला. आता अनिसच्या आई वडिलांना घरी गेल्यावरच त्याच्या मृत्यूची माहिती कळेल.