‘महारेरा’ने फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात सेवानिवृत्त, ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वांच्या आदेशाचा मसुदा सूचना आणि मतांसाठी प्रसिद्ध केला होता. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांबरोबरच अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सूचना केल्या आहेत. त्यांचा या निर्देशांना अंतिम स्वरूप देण्यास फायदा झाला. तत्पूर्वी, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने याविषयी आदर्श मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. ‘महारेरा’ने त्याचा आधार घेत निर्देश तयार केले.
तरतुदी काय?
० एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीस लिफ्ट आवश्यकच. तिथे व्हीलचेअरचा उपयोग होऊ शकेल, अशी रचना असावी.
० इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरवर अडथळ्याशिवाय फिरता येईल असे आरेखन हवे. आवश्यक तिथे रॅम्प असावेत.
० सर्व लिफ्टमध्ये दृकश्राव्य व्यवस्था असावी. प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हालचाल करता येईल, अशी लिफ्ट अत्यावश्यक.
० दोन पायऱ्यांमधील अंतरही फार असू नये. जिनाही १२ पायऱ्यांपेक्षा मोठा असू नये.
० स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असावी. स्वयंपाकघरात नैसर्गिक प्रकाश व्यवस्था असावी.
० शौचालयामध्ये घसरून पडता येणार नाही, अशा टाईल्स असाव्यात.
इमारतीमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था असावी.