कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बोरगाव, शिरढोण येथील दोघांना ताब्यात घेवून दोघांनी पैजेत लावलेली सुमारे दोन लाख पंधरा हजार रूपये किंमतीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी याच्यावर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.
बोरगाव येथील रमेश संभाजी जाधव आणि शिरढोण येथील गौस मुबारक मुलाणी यांनी सांगली लोकसभा निवडणुकीचा निकालाबाबत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल की अपक्ष उमेदवार निवडून येईल यासाठी स्वतःच्या फायद्याकरता निवडणुकीतील उमेदवारावर बुलेट आणि युनिकॉर्न गाड्यावरती पैजा लावल्या होत्या.
पैज लावून संदेश सोशल मिडियाद्वारे प्रसारित केला होता. या पैजेची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू होती. पैजा लावल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कारवाई करत दोघांना ताब्यात घेत दोघांच्या दोन्ही दोन लाख पंधरा हजाराच्या मोटरसायकली जप्त केल्या. दोघावर पोलिसांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.