तबरेझ हा कुख्यात बापू नायर टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे सात गंभीर गुन्हे दाखल असून, तो मार्च २०२२ पासून कारागृहात आहे. सध्या तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तत्पूर्वी, कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने १४ क्रमांकांचा वापर करून तक्रारदारांकडे खंडणी मागितली. त्यानंतर फोनवर खुनाची धमकी दिली; तसेच काही गुंडांना घरी पाठवून दमबाजी केली. या धमक्यांना घाबरून व्यावसायिकाने दहा लाख रुपयांची खंडणी दिली. त्यानंतर तबरेझने आणखी तीस लाख रुपयांची खंडणी मागितली; अन्यथा तीन गुंठे जागा नावावर करून देण्यास सांगितले.
तक्रारदारांनी त्यास नकार दिल्याने तबरेझने गुंड पाठवून धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे तक्रारदारांनी खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेतली. पोलिसआयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहन जाधव, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक समीर कदम तपास करीत आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
संबंधित तक्रादार काही वर्षांपूर्वी (२०१२) तबरेझ सुतारच्या चारचाकीवर चालक म्हणून काम करीत होता. तबरेझ २०१७मध्ये एका गुन्ह्यात फरार झाला. त्यामुळे तक्रारदाराने चालकाची नोकरी सोडून जमीन खरेदी-विक्री आणि इलेक्ट्रिकचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्यांचा जम बसल्याचे तबरेझच्या कानी आले. त्यामुळे त्याने तक्रारदारांकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील तीन लाख रुपये त्याने वसूलही केले. तबरेझला २०२२ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यामुळे त्याने कारागृहातून फोनद्वारे तक्रारदारांना धमकावून साथीदारांमार्फत सात लाख रुपये उकळले. त्यानंतर तबरेझने आणखी तीस लाख रुपये खंडणी मागितली. त्यानंतर मात्र, तक्रारदारांनी खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेतली.