लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा येत्या सोमवारी पार पडणार आहे. या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी होणार असून तत्पूर्वी आज, दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा संपन्न झाली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी प्रोटोकॉल तोडून राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर भाषण करण्याची संधी दिली गेली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, शिवछत्रपतींचे गडकिल्ले, मुंबई लोकल आदी मुद्द्यांना स्पर्श केला.
जे सत्तेतच येणार नाहीत त्यांच्यावर कशाला बोलायचं?
राज ठाकरे म्हणाले, २०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यतचे बोलूया. इथल्या वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवले. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९ ते २०२४ काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो.
मोदी होते म्हणून धाडसी निर्णय घेतले
मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. काश्मीर भारताचा भाग आहे हे ३७० कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटून गेलो. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन.
पुढे बोलताना राज म्हणाले, आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, ओवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत त्यावर कायमचा चाप बसवा, असे राज म्हणाले.
राज ठाकरे यांच्या मोदींकडे ६ मागण्या
१) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी.
२) जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा.
३) शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं.
४) तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही.
५) मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या.
६) देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा.