Ghatkopar Hoarding: भावेश भिंडेला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी, मुंबई न्यायालयाचा निर्णय

मुंबई: घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळल्याप्रकरणी भावेश भिंडे याला मुंबई न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भिंडे याला राजस्थानमधील उदयपूर येथून अटक करण्यात आली होती. भिंडे याच्यावर यापूर्वीही बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर होता. घाटकोपर येथील या घटनेत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ७५ जण जखमी झाले. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जाहिरात एजन्सी या परिसरात होर्डिंग्ज लावण्यासाठी जबाबदार होती.
Ghatkopar Hoarding: बचावकार्य अखेर संपुष्टात, कोसळलेल्या होर्डिंगखालून तब्बल ७१ वाहने बाहेर काढली
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिंडेला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के एस झंवर यांच्यासमोर हजर केले. १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. भावेश भिंडेच्या एजन्सीकडे आणखी तीन-चार होर्डिंगची जबाबदारी आणि एका होर्डिंगबाबत पाच कोटी रुपयांचा व्यवहार गुंतलेला असतो. त्यामुळे आर्थिक बाबींची चौकशी करायची असून घाटकोपरच्या होर्डिंगच्या उभारणीला कोणी आणि कशी परवानगी दिली, त्याचीही चौकशी गरजेची आहे. म्हणून १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. ही मागणी न्यायालयाने मंजूर करून भावेश भिंडे याला पोलीस कोठडी सुनावली.

आरोपींची बाजू मांडणारे अधिवक्ता रिजवान मर्चंट यांनी दावा केला की पोलिसांनी भिंडे यांना अटक करण्याचे कारण सांगितले नाही. ज्यामुळे रिमांडची याचिका अवैध ठरली. भिंडे डिसेंबर २०२३ मध्ये फर्मचे संचालक झाले तर दुर्दैवी होर्डिंगचे कंत्राट इगो मीडियाला नोव्हेंबर २०२२ मध्ये देण्यात आले होते. त्यामुळे त्या वेळी जे घडले त्याला ते जबाबदार नाहीत, असा युक्तिवाद वकिलाने केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने होर्डिंगला परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे.