Manikdoh Leopard Rescue Centre : वाढता मनुष्य-बिबट्या संघर्ष, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण

प्रतिनिधी, पुणे : जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अकोलेसह लगतच्या भागात सातत्याने बिबट्यांकडून होणारे हल्ले आणि चिघळलेला मनुष्य-बिबट्या संघर्ष लक्षात घेता वन विभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पिंजरे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या विस्तारासाठी वन विभागाने जलसंपदा विभागाकडून दहा एकर जागा विकत घेतली असून, या जागेत नवीन साठ पिंजरे बांधण्यात येणार आहेत.पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी गुरुवारी वनभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ‘जखमी आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या बिबट्यांच्या उपचारासाठी जुन्नरमध्ये माणिकडोह बिबट निवारा केंद्र वीस वर्षांपासून कार्यरत आहे. सध्या या केंद्राची क्षमता चाळीस बिबट्यांना ठेवण्याची आहे. मात्र, अलीकडे बिबट-मनुष्य संघर्ष चिघळल्याने मनुष्यावर हल्ला करणारे; तसेच विविध कारणांस्तव अपघातात जखमी झालेले बिबटे केंद्रात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा केंद्रात आलेल्या बिबट्याला ठेवायचे कुठे, हा प्रश्न वन अधिकाऱ्यांना भेडसावतो. बहुतांश बिबट्यांना पुन्हा सोडले जाते, तरीही निसर्गात सोडता येणार नाही अशा बिबट्यांची संख्या वाढली आहे,’ असे प्रवीण यांनी सांगितले.

High Blood Pressure Day : जाणून घ्या उच्च रक्तदाबाबाबत तज्ज्ञांचा इशारा, रक्तदाब कसा नियंत्रित करावा?

दररोज १० ते १५ फोन

‘जुन्नर आणि लगतच्या भागातून आम्हाला दिवसाला दहा ते पंधरा फोन बिबट्यांसाठी येतात. ऊसकापणी सुरू झाल्यावर पिल्लांसह बिबट्या दिसल्याच्या घटना वाढतात. त्यांची वाढती संख्या, अपघात आणि संघर्षाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही बिबट निवारा केंद्राचा विस्तार करत आहोत. यासाठी जलसंपदा विभागाला सध्या केंद्राशेजारी असलेली जमीन देण्याची मागणी केली होती. संमती मिळाल्याने एक कोटी २७ लाख रुपये देऊन आम्ही जागा ताब्यात घेतली आहे,’ असेही प्रवीण यांनी नमूद केले.

पिंजऱ्यांची संख्या १००वर?

‘सध्या या जागेतील पिंजऱ्यांची रचना आणि प्रस्तावित बांधकामाचे नियोजन आहे. वर्षभरात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विस्तारामुळे केंद्रात अजून साठ नवीन पिंजरे उपलब्ध होणार असल्याने पिंजऱ्यांची संख्या शंभर होणे अपेक्षित आहे,’ असे प्रवीण यांनी सांगितले.

जुन्नर झालंय बिबट्यांचे गाव

जुन्नर भागातील बिबटे पंचवीस वर्षांपासून चर्चेत आहेत. देशात एकाच भागात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य असलेल्या प्रदेशामध्ये जुन्नरचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांत जुन्नर आणि लगतच्या प्रदेशात उसशेती वाढली आहे. उसामुळे सुरक्षित अधिवास, मुबलक पाणी आणि भटक्या-पाळीव जनावरांमुळे बिबट्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. गावकऱ्यांना दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होतेच. बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे जुन्नरला अलीकडे बिबट्यांचे गाव ही ओळख मिळाली आहे.

जुन्नरमधील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभाग त्यांची नसबंदी करण्याच्या विचारात आहे. याबाबत केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला (एनटीसीए) प्रस्ताव पाठवला आहे. यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्यूआयआय) या भागातील बिबट्यांची जाहीर केलेले आकडे आणि सद्यस्थितीचे दाखलेही दिले आहेत. केंद्रीय पातळीवर हा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे.

– एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक, पुणे वन विभाग