एवढा जाहीर पाणउतारा सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली; पण नेत्याच्या स्थानाचे दडपण असल्याने त्यांच्यातील कोणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला नाही.
अखेर एका युवक नेत्याला राग अनावर झाला. त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वांनी चांगले काम केले असून, त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा मुद्दा काढून त्यांनी नेत्यांचे शरसंधान करण्यास सुरुवात केली. त्या निवडणुकीत टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती, तर एवढे रामायण घडलेच नसते, असे सांगताना या नेत्याने ‘हू इज धंगेकर’ हा प्रश्न आपण आज सहजपणे विचारू शकलो असतो, असे म्हटले. त्यामुळे नेत्यांचाही पारा चढला.
या दोघांचा आवाज चढल्याने कार्यकर्ते चकीत झाले. एरवी संयमी व मितभाषी अशी ओळख असलेल्या या नेत्यांची ही चर्चा अशा पद्धतीने कशी होते आहे, असाच प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यात मध्यस्थी कोणी करायची अशीही कुजबूज सुरू झाली. या वेळी उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनी दोघांनाही शांत केल्यानंतर प्रकरण निवळले.
अहवालाच्या चर्चेने दणाणले धाबे
पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आजी-माजी लोकप्रतिनिधींसह प्रत्येक पदाधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली होती. त्यानुसार प्रत्येकाने कसे काम केले, आपली जबाबदारी पार पाडली का, याचा अहवाल ‘कोअर कमिटी’ तयार करत आहे; याशिवाय एका स्वतंत्र यंत्रणेतूनही पुणे लोकसभेत पक्षाने केलेल्या कामगिरीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जात असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे कामाचा केवळ देखावा केलेल्यांचे किंवा कामाकडे दुर्लक्ष केलेल्यांची धाबे दणाणले आहे.