Pune Crime : बारामतीत बेकायदा सावकारांचा सुळसुळाट, नोटरी व कोरे चेक घेणाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात

संतराम घुमटकर, बारामती : उपविभागात वाळू, मुरूम, माती, लँड माफिया; तसेच कामगार नेते पैशांच्या जोरावर बनावट मुद्रांकाच्या मदतीने व कोरे चेक घेऊन जमीन, घरे (फ्लॅट), चारचाकी व दुचाकी वाहने, सोने अशी मालमत्ता हडप करीत आहेत. बारामती उपविभागातील अशा अवैध सावकारांची हिटलिस्ट पोलिस प्रशासनाने तयार केली असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.

बेकायदा सावकारांचा सुळसुळाट


बारामती उपविभागात बारामतीत ४६ परवानाधारक सावकारांनी ७३७ गरजवंतांना चार कोटी ७५ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, इंदापूरमध्ये ५२ परवानाधारक सावकारांनी १७५ गरजवंतांना दोन कोटी २० लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. मात्र, परवाना असलेल्या सावकारांच्या विरोधात उपविभागात एकही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. ७५ विनापरवाना बेकायदा सावकारांचा मोठा सुळसुळाट सुरू आहे. यामध्ये वाळू, मुरूम, माती, लँड माफिया; तसेच काही स्थानिक कामगार नेत्यांचा समावेश आहे.

उत्पादन शुल्कचा निरीक्षक एसीबीच्या ‘प्याल्यात’; बीअर बारच्या परवान्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच

तक्रारदारांना योग्य न्याय

बारामती एमआयडीसीमधील तीन मोठ्या नामांकित कंपनीतील कामगार; तसेच काही व्यापारी सावकारांच्या गळाला लागले आहेत. अनेक कामगारांनी स्वतःची घरे, वडिलोपार्जित शेतजमीन आदी गोष्टी व्याजापोटी विनाखुशी लिहून दिल्या आहेत. उपविभागात कायम खुश खरेदी केलेले, कोरे चेक, अन्य कागदपत्रे घेऊन सावकारी केल्याप्रकरणी २०२२पर्यंत २१ सावकारांविरुद्ध प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी सर्व तक्रारदारांना योग्य न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे पीडितांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी ‘मटा’ला सांगितले.

प्राथमिक माहितीनंतर कारवाई

७५ अवैध सावकारांची प्राथमिक माहिती गोपनीय कर्मचारी, बीट अंमलदार, गावांतील गावकामगार तलाठी, पोलिस पाटील, सोसायट्यांचे सचिव, ग्रामसेवक, कोतवाल यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. कागदोपत्री कमी कर्ज दाखवणाऱ्या सावकारांकडून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप होत असल्याचे पोलिस चौकशीत समोर आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. गरजूंच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन अव्वाच्या सव्वा व्याज आकारून जमिनी घेणाऱ्या सावकारांना चौकशीमध्ये अन्य सरकारी कर्मचाऱ्यांनी साह्य केल्याचे आढळल्यास त्यांना सहआरोपी करण्यात येणार आहे.

पोलिसांची कामगिरी

– २०२२मध्ये पोलिसांनी ८६ जणांची केली अवैध सावकारकीतून मुक्तता

– बारामती उपविभागात ११० तक्रारी दाखल असून, पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून पीडितांना ६५ प्रकरणांतील १२ एकर जमीन, १६ घरे (फ्लॅट), १३ चारचाकी व दुचाकी वाहने, १६ तोळे सोने अशा मुद्देमालासह स्थावर मालमत्ता मिळवून दिली आहे. अवैध सावकारीमध्ये २८५ आरोपींचा समावेश आहे.

बारामती उपविभागातील सावकारी

९८

परवानाधारक सावकार

७५

प्राथमिक माहितीनुसार बेकायदा सावकार

९१२

परवानाधारक सावकारांकडून घेतले कर्ज

सावकारी पीडित असलेल्या व्यक्तींनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. सावकारीबाबत आलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. खासगी सावकारकीला बळी पडलेल्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी

पुणे ग्रामीण पूर्व विभागात कोणत्याही व्यक्तीची सावकारांकडून पिळवणूक होत असल्यास त्यांनी तक्रार द्यावी. प्राथमिक चौकशी आणि कागदपत्रे तपासून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक, बारामती