Pune News: निवडणुकांच्या धामधुमीत अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळेना, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी, पुणे : पुणे-पिंपरी चिंचवडसह राज्यातील महानगरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. दहावीच्या निकालापूर्वी महिनाभर आधीच दरवर्षी ही प्रक्रिया सुरू होते; पण यंदा दहावीचा निकाल मे अखेरपूर्वीच जाहीर करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झालेली नाही. निवडणुकांच्या धामधुमीत शिक्षण विभागाला अकरावी प्रवेश प्रक्रियेचा विसर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल मे अखेरपर्यंत जाहीर होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. शालेय शिक्षण विभागाकडून पुणे, पिंपरी-चिंचवडसह, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक अशा महानगरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने, तर इतर शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

MahaRERA : बिल्डर देणार घराच्या गुणवत्तेची हमी, महारेराद्वारे घोषणापत्र जाहीर करणे होणार बंधनकारक

विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेची योग्य माहिती व्हावी; तसेच विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी प्रक्रिया आणि त्यातील भाग एक भरण्याची प्रक्रिया सुमारे महिनाभरापूर्वी सुरू करण्यात येते. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, गुणांनुसार ज्युनिअर कॉलेजांचे पर्याय भरण्याची प्रक्रिया सुरू होते. अशाच पद्धतीने गेल्या तीन वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. मात्र, यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयी शिक्षण विभागाकडून अद्याप तरी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. शिक्षण विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांकडे कदाचित निवडणुकीचे काम असल्यामुळे शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू केली नसल्याचे चित्र आहे.

प्रवेश दिवाळीपर्यंत रेंगाळणार

अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होऊनही, विविध कारणांमुळे दिवाळीपर्यंत रेंगाळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उशिराने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. अशावेळी ही प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होऊन, कमी कालावधीत पूर्ण होण्याची आवश्यकता असते. यंदा प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू न झाल्याने, प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत रेंगाळण्याची शक्यता अधिक आहे.

विद्यार्थी-पालकांना काळजी

दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे सोळा लाख विद्यार्थी बसतात. यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थीही उत्सुक असतात. पाल्याला अकरावीसाठी चांगले कॉलेज प्रवेशासाठी मिळावे, याची पालकांनी काळजी असते. यंदा, प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत भाग एक म्हणजे काय ?

– अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागते.

– या नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्याला नाव, जन्मतारीख, पत्ता, ई-मेल आयडी, प्रवर्ग, मोबाइल क्रमांक अशी सामान्य माहिती भरावी लागते.

– ही माहिती भरल्यानंतर त्याची पडताळणी होते.

– दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग दोन भरता येतो. त्यामध्ये दहावीचे गुण आणि कॉलेजांचे पर्याय भरता येतात.

– अशा पद्धतीने भाग एक आणि भाग दोन अशा अकरावी प्रवेशाचा पूर्ण अर्ज भरता येतो.