चारसौ पारची घोषणा भाजपच्या अंगलट, त्यांना २५० पार करता येणार नाही
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आकड्याची भविष्यवाणी करणे हे धोक्याचे असते. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे स्पष्ट आहे. माझ्या दृष्टीकोनातून सध्या सहा राज्य महत्वाची आहेत. ज्यात बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश असून या राज्यांमध्ये भाजपची संख्या कमी होईल. महाराष्ट्राचेच उदाहरण द्यायचे झाले तर पक्ष फोडण्याचा प्रकार मतदारांनी पाहिला आहे, त्यामुळे मतदारांमध्ये या सर्व प्रकाराबाबत प्रचंड सहानभुती आहे. त्यामुळे आताचे वातावरण लक्षात घेता ही संख्या ३२ ते ३५ जागांपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच भाजपची ४०० पार ही घोषणा त्यांच्या अंगलट आली आहे. सध्या ३०३ पेक्षा जास्त जागा याव्यात, यासाठी मोदींची धडपड सुरु आहे. भाजपला २२० ते २५० तर एनडीएच्या मिळून जागा २७२ पर्यंतही जाणार नाहीत, असे भाकीत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मुस्लीम मतांचे नाही तर मोदी हिंदू मतांचे राजकारण करतायेत
ते पुढे म्हणाले की, हिंदु मुस्लिम असो किंवा अदानी अंबानींनी काँग्रेसला टेम्पो भरुन पैसे दिल्याचे केलेले वक्तव्य, हे दोन्ही वक्तव्य निवडणुकीत टर्निंग पाईंट असणार आहेत. आमच्याकडे जर पैसे आले असतील तर ईडीसारख्या यंत्रणा काय करत आहेत, असा सवाल करून चव्हाण म्हणाले की, याचाच दुसरा अर्थ असा की देशातील उद्योगपतींना वारा कुठल्या दिशेने वाहतो आहे, हे स्पष्ट दिसू लागले आहे. सध्या मुस्लिम मतांवरून राजकारण सुरु आहे, असे अजिबात नाही. हे राजकारण हिंदू मतांचे आहे. मुस्लिम समाजामध्ये भय निर्माण करुन हिंदुंची मते खेचून घेण्याचा हा सर्व प्रकार आहे. पंतप्रधान मुस्लिमांबाबत जे बोलत आहेत, असे द्वेषाचे वक्तव्य देशाच्या इतिहासात कोणत्याच पंतप्रधानांनी केलेले नाही. त्यांनी धार्मिक धृवीकरणाचा केलेला हा प्रकार चुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात आता सारवासारव सुरु केली असल्याचा दावा चव्हाण यांनी यावेळी केला.
त्यामुळे दोन पक्ष कमी होतील
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच काही पक्ष काँग्रेसमध्ये येत्या काळात विलीन होतील, अशी शक्यता वर्तविली होती. त्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सहा पक्ष टिकणं अवघड आहे. त्यामुळे इतर दोन पक्ष येत्या काळात कमी होतील असे मला वाटते, असे चव्हाण म्हणाले.
त्यावेळी कृषीमंत्री कोण होते?
राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याबात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, याप्रकरणी ऑडीटरने बँकेत अनेक चुकीच्या गोष्टी सुरु असल्याचे बँकेला दिलेल्या अहवालात नमूद केले होते. त्यानंतर ऑडीटरचा हा अहवाल नाबार्डकडे गेला. नाबार्ड हे कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित येते. त्यावेळी दिल्लीत कृषीमंत्री कोण होते, हे आपल्या सर्वांना माहित आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगाविला.