‘तो’ प्रस्ताव मीच दिलेला; शिंदेंच्या CMपदाबद्दल फडणवीसांचा गौप्यस्फोट, लॉजिकही सांगितलं

मुंबई: दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात पुन्हा युतीचं सरकार आलं. शिंदे भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. भाजपनं धक्कातंत्राचा वापर केला. पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. या धक्कातंत्राबद्दल फडणवीसांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

मी मुख्यमंत्री होणार नाही, याची पूर्वकल्पना होती, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सत्तास्थापनेवेळी घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. पण त्याविषयी माझ्या मनात कोणतीही नाराजी नव्हती. एक मिनिटदेखील मला वाईट वाटलं नाही, असं फडणवीस म्हणाले.
Mumbai Hoarding Collapse: कोण लागतो तुमचा? होर्डिंग दुर्घटनेवरुन राम कदमांचा ठाकरेंना सवाल; भुजबळांकडून मोलाचा सल्ला
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात यावं हा प्रस्ताव मीच दिला होता, हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतो. एकनाथ शिंदेंसोबत अनेक आमदार आले होते. त्यांचा विश्वास कायम राखला जाणं आवश्यक होतं. मी पक्षाला हीच गोष्ट सांगितली. मी मुख्यमंत्री होणार नाही याची पूर्वकल्पना मला होती, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.
ठाकरे, शिंदेंच्या शिलेदारांना आव्हान, निवडून येण्याआधीच राजीनाम्याची भाषा; ‘तो’ उमेदवार कोण?
राज्यातील महायुतीच्या जागावाटपाबद्दलही फडणवीस सविस्तर बोलले. सगळं काही योजनाबद्ध पद्धतीनं झालं. ९० टक्के विषय आम्ही आधीच सोडवले होते. १० टक्के जागांवर उशीर झाला. पण त्या जागा अखेरच्या टप्प्यातल्या होत्या. त्यामुळे घाई केली नाही. पाच जागांवर बरीच चर्चा झाली. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. चर्चेविना जागांवर उमेदवार घोषित करायचे, असा महाविकास आघाडीसारखा प्रकार आम्ही केला नाही, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंविषयी जनमानसात सहानुभूती असल्याचं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांच्याबद्दल सहानुभूती का असेल, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ‘त्यांचा पक्ष अहंकारामुळे फुटला. आमचा विश्वासघात करुन ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंचे पंख कापण्याचा प्रयत्न केला,’ अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली.