देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेची सत्तास्थापना व त्यानंतरच्या घडामोडी तसेच लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या निर्णयांबाबतही या मुलाखतीत मते मांडली. ‘शरद पवारांनी स्वत:च आमच्याकडे अजित पवार यांना पाठवले आणि मग जाणीवपूर्वक हात वर केले. त्यांनी अजित पवारांना खलनायक बनवले आणि स्वतः नायक बनले. ते कधीही त्यांच्या पक्षाची धुरा अजित पवारांकडे देणार नाहीत, ते सुप्रिया सुळेंनाच राजकीय वारसदार बनवणार याची अजित पवारांना कल्पना आल्यानेच राजकीय अस्तित्वासाठी अजित पवार फुटले’, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा घटनाक्रमही फडणवीस यांनी सांगितला. ‘एकनाथ शिंदे हे कायम पक्षासाठी एकनिष्ठ राहिले. मात्र, त्यांचे नेते उद्धव ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाकडून काँग्रसकडे झुकले. त्यांनी आदित्यला मोठे करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पंख कापायला सुरुवात केली. वास्तविक २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी नेतृत्व केले होते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्येही ते होते. त्यांच्यावरच अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. ‘सरकार स्थापन होईल, तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री’ असेही शिंदे यांना सांगण्यात आले होते. तसे ते सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते. त्यांच्या घरी तशाप्रकारची पोलिस सुरक्षाव्यवस्थाही तैनात करण्यात आली होती; मात्र नंतर उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलत स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. २००४मध्येही जेव्हा नारायण राणे सामर्थ्यशाली झाले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना दूर केले होते. शिंदे यांच्या खात्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेत होते. राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिंदे यांनी पुढे बंड केले. त्यामुळे अशा पक्षांना वा त्याच्या प्रमुखांना सहानुभूतीची मते मिळणार नाहीत’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे.
– महायुतीमध्ये जागावाटपात काही जागा भाजपला मिळायला हव्या होत्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. विशेषतः ठाण्याची जागा… अशावेळी भाजपचे कार्यकर्ते दुखावले जात नाहीत का?
– जागावाटपात जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा कोणत्याही पक्षाची असणारच. आम्हाला ३० जागा मिळण्याची अपेक्षा होती. तसे झाले असते, तर खूप आनंद झाला असता; मात्र २८ जागा मिळाल्या. ठाण्यासाठी आमचा विशेष आग्रह होता. सुरुवातीला ही जागा आमच्याकडे होती. मात्र गेल्या सात निवडणुकांमध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्याचे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे होते. त्यात ही जागा माझ्या गुरूंनी अर्थात आनंद दिघे साहेबांनी शिवसेनेकडे घेतली होती. दिघे साहेबांची जागा मी सोडली, तर त्याच्यातून काही प्रेरणादायी संकेत जाणार नाहीत, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे असल्याने भाजपने ती जागा सोडली. आमचा कार्यकर्ता यामुळे निराश झाला. मात्र त्यानंतर पक्षाचे नेते गणेश नाईक, संजीव नाईक, तसेच आमची मिरा-भाईंदर तसेच ठाण्यातील टीम जोरदार कामाला लागली आहे.
– मनसे आणि उत्तर भारतीय मतदार असा जुना वाद आहे. राज ठाकरे महायुतीत आल्याने त्याचा फटका बसेल का?
– हा वाद आधी असला तरी मागच्या चार ते पाच वर्षांत राज ठाकरे यांनी पूर्णपणे हिंदुत्ववादाची व्यापक भूमिका अंगीकारली आहे. तुम्ही शिवसेनेचा सुरुवातीचा प्रवास पाहिला, तर तोही असाच होतो. प्रत्येक पक्षाला स्थानिक अस्मिता असतेच. त्याचा निश्चितच आदर असायला हवा. मात्र आता राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे उत्तर भारतीयांना यात आपत्ती असण्याचे काही कारण नाही, असे मला वाटते.
– यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांच्याविरोधात आरोप केले आणि आता त्यांच्यासाठी कशी मते मागणार ?
– शिवसेना आता आमच्यासोबत आली असून, त्यांच्या पक्षात त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. महायुतीत ज्या पक्षाचा उमेदवार त्याचा आम्ही प्रचार करणार. यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचाही प्रचार करणार. मात्र आम्ही जे लढतोय ते कोणाच्या विरोधात लढतोय ते पाहणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांच्या म्होरक्यांच्या विरोधात लढतोय. हे असतीलच तर प्यादे असतील, मात्र ते ज्यांच्या इशाऱ्यावरून काही करीत होते, त्यांच्याच विरोधात आम्ही लढा देतोय. महापालिका कोण चालवत होते? आदेश कोणाचे होते? आम्ही यांच्यावर नव्हे तर त्यांच्या प्रमुखांवरच आरोप केले असून, त्यांचा आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही.
– देवेंद्र फडणवीस दिल्लीत तर गेलेच नाहीत, शिवाय लोकसभेत प्रचाराची सूत्रे तुमच्याकडेच आहेत त्याविषयी…
– आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असून, मोठा पक्ष असल्याने विधानसभा तिकीटवाटपात आमचाच मोठा वाटा असणार. त्यातही आमचे ११५ आमदार आहेत. स्ट्राइक रेट चांगला असतो, हे आम्ही मागील निवडणुकांत दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्ही यावेळेलाही तसाच स्ट्राइक रेट ठेवणार आहोत. आता प्रश्न राहिला माझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा… तर तो निर्णय माझा पक्ष आणि आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील. पण जेवढा मी पक्षाला समजतो आणि ओळखतो, तसेच महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता ते मला महाराष्ट्रातच जबाबदारी देतील.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
– भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात राष्ट्रवादीविषयी, अजित पवारांविषयी रोष आहे, असे असताना तुम्ही त्यांच्याशी कसे काय जुळवून घेत आहात?
– मी सुरुवातीपासूनच सांगतोय की भाजप आणि शिवसेना यांची युती ही भावनिक आहे, तर भाजप आणि राष्ट्रवादी यांची राजकीय युती आहे. त्यामुळे लगेच दोन-चार महिन्यांत आमचे सूर जुळणार नाहीत. कदाचित त्यासाठी दहा वर्षे लागतील. पण जर तुम्ही पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पाहिली, तर त्यांना काय विचारधारा आहे? राज्यात १९७८मध्ये ‘पुलोद’चे सरकार स्थापन झाले, तेव्हा पवारसाहेब सर्वप्रथम मुख्यमंत्री बनले, ते केवळ भाजपच्याच पाठिंब्यामुळे. त्यामुळे आम्हाला त्यांच्या विचारधारेची अडचण नाही, तर त्यांच्या मुस्लिमांच्या लांगूलचालनाच्या, तुष्टीकरणाच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. देशातील संसाधनांवर सर्वांत पहिला मुस्लिमधर्मियांचा अधिकार असल्याचे जे म्हणणे आहे, त्याला आमचा विरोध आहे. या संसाधनांवर सर्वप्रथम गरिबांचा आणि तोही जात-धर्मविरहित सर्व गरिबांचा अधिकार आहे, असे आमचे म्हणणे आहे. सर्वांना समान न्याय आणि तुष्टीकरणाला थारा नाही हे आमचे धोरण आहे. यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात आमच्या जनाधारामध्ये त्याचा राग होता; मात्र आता ती अढी हळूहळू दूर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामध्ये मिसळत आहे, अर्थात शिवसेनेएवढी निश्चित नाही. मात्र आमच्या जनाधाराच्या मनातील अढी दूर झाल्याचा प्रत्यय तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात येईल. भाजपचा आमदार असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे भरघोस मते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील, ते तुम्ही पहाच. हा मतदारसंघ भाजपकडे असून तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भरघोस मते मिळतील, ते पहायला मिळेल.