लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपला मिळत असलेला प्रतिसाद, विरोधकांचे सहानुभूतीचे आणि लांगूलचालनाचे राजकारण, महायुतीतील जागावाटप, मुंबईतील पायाभूत सुविधा आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाविषयी सविस्तर भाष्य केले. ठाकरे गटाला मिळणाऱ्या मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याबाबत ते म्हणाले, ‘आज तुम्ही ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयात गेल्यास तिथे मुस्लिम समाज मोठ्या संख्येने दिसतो. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये‘अल्लाहो अकबर’; तसेच ‘टिपू सुलतान झिंदाबाद’चे नारे ऐकायला मिळतात.’
‘शिवसेनेचे गमछे घालून सभांमध्ये मुस्लिम दिसतात. आता ठाकरे गटाकडून ‘व्होट जिहाद’ करा अशाप्रकारचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. मराठी मतांमधील कमी झालेला टक्का आता ते मुस्लिम मतांद्वारे भरून काढण्याच्या प्रयत्नांत आहेत. मात्र, त्यांच्याकडून अशा प्रकारचे तुष्टीकरणाचे कितीही राजकारण झाले, तरी हा खोटा प्रचार मुस्लिमांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. आपले जर कोणी भले करणार असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, याची जाणीव त्यांना झाली आहे. समाजातील काही वरिष्ठांच्या दबावाखाली भाजपच्या विरोधात बोलणारा एक मोठा वर्ग आजही असला, तरी मात्र नरेंद्र मोदींना गुपचूप मते देणाराही मोठा वर्ग आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मराठींचे वारंवार भाजपला मतदान
‘मराठी मतदार हा केवळ ठाकरे गटाच्या मागे आहे, हे डोक्यातून काढा. २०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो. शिवसेनेला ८४ तर आम्हाला ८२ जागा मिळाल्या. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो. तेव्हा मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजपचे अधिक आमदार जिंकून आले. आम्ही काही बाहेरून आलेलो नाहीत. मी पक्षाचा मराठी नेता आहे. आमचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार मराठी आहेत. मराठी मतदारांनी आम्हाला वारंवार मतदान केले आहे. आता राज ठाकरे यांना मानणारा मतदार आमच्यासोबत आहे. शिवाय मोदी यांना जात, धर्म आणि भाषा याच्या पलीकडे जाऊन मानणारा मतदार आमच्यासोबत आहे. त्याचा फायदा निश्चित आम्हला होईल,’ असेही फडणवीस म्हणाले.