औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडीत उत्पादनाबाबत कंपनीने आवश्यक दक्षता घेतली नाही आणि औषधांचा अपेक्षित दर्जा सांभाळला नाही, तर औषधांसारखे उत्पादन ऑनलाइन विक्रीस ठेवताना वितरक कंपन्यांनी आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे, असे ताशेरेही आयोगाने निकालपत्रात ओढले आहेत.
पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्या प्रणाली सावंत व शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणात खेसे पार्क येथील रहिवासी पंकज जगसिया यांनी ‘मॅक्लाउड्स फार्मास्युटिकल्स’ ही औषध निर्माती कंपनी व तिचे संचालक, दादा कंपनी आणि नेटमेड्स डॉट कॉम आणि प्लॅनेट फार्मा या औषध वितरक कंपन्यांच्या विरोधात आयोगात तक्रार दाखल केली होती.
तक्रारदारांनी ‘नेटमेड्स’च्या संकेतस्थळावरून त्यांच्या ७२ वर्षांच्या आईसाठी औषधे मागवली होती. त्याचे सीलबंद पाकीट २२ सप्टेंबर २०१९ ला तक्रारदारांना मिळाले. त्यातील औषधांच्या दहापैकी दोन गोळ्यांचा रंग गेला होता, तसेच त्यांना बुरशी आली होती. त्यामुळे तक्रारदारांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. हे औषध आईने घेतले असते, तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकले असते, असा दावा करत तक्रारदारांनी कंपन्यांविरोधात आयोगाकडे धाव घेत सदोष औषधे पुरविल्याची तक्रार केली. आयोगाने नोटीस बजावल्यावर औषध निर्मात्या कंपन्यांकडून कोणी हजर झाले नाही, तर औषध विक्रेत्या कंपन्यांनी आपला लेखी जबाब मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे आयोगाने ग्राहकाच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला.
अन्न आणि औषध प्रशासनानेही दिला अहवाल
तक्रारदार ग्राहकाला ऑनलाइन आलेल्या औषधी गोळ्यांची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाने केली. त्यात या औषधांचा रंग गेला होता, तसेच त्यांना बुरशी लागल्याचे आढळून आले. त्यामुळे कंपन्यांनी ग्राहकाला सदोष औषधे पुरविल्याचे सिद्ध झाले.