त्यानुसार १७ मे रोजी बीकेसी येथे महाविकास आघाडीची सभा होणार असून या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आपचे अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
मुंबईसह राज्यातील एकूण १३ मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून या प्रचाराची सांगता १८ जून रोजी संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे १७ मे रोजी महाविकास आघाडीने भव्य सभेचे आयोजन केले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यात मुंबईमधील सहा जागांसह राज्यातील १३ मतदारसंघात सोमवार २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. येथील प्रचार तोफा शनिवार १८ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता थंडावतील. त्यामुळे शेवटचा वीकेंड तशा अर्थाने प्रचाराला मिळणार नाही. मात्र प्रचार सांगतेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी होणाऱ्या सांगता सभेसाठी मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे मैदान कोण गाजवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
महायुतीतर्फे १७ मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथे सभा घेण्यात येणार असल्याने महाविकास आघाडीची सभेच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर या सभेसाठी बीकेसीची जागा निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे रमेश चेन्निथला यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
याआधी दसरा मेळाव्याच्या वेळीही ठाकरे गटाला शिवाजी पार्कचे मैदान मिळाले नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आधी अर्ज केल्यामुळे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा झाला होता. तर ठाकरेंना बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्यासाठी समाधान मानावे लागले होते, यावेळीही उद्धव ठाकरेंना बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा अखेर करावा लागू शकतो. परंतु त्यांना बीकेसीचे मोठे मैदानही मिळू नये, यासाठी महायुतीतर्फे तिथल्या जागेसाठी अर्ज करण्यात आल्याची चर्चा आहे.