एकत्र कुटुंबांचे मतदानाच्या निमित्ताने गेटटुगेदर
शहराच्या वेगवेगळ्या भागांतील मतदार केंद्रांवर एकत्रित मतदान करण्यासाठी आलेली मोठी कुटुंबही बघायला मिळाली. घरातील ज्येष्ठ सदस्यांबरोबरच, त्यांची मुले बहिण-भावंडे, भाचे-पुतणे, नातवंडांच्या या गोतावळ्याने एकत्रित मतदानानंतरचा क्षण फोटोमध्ये टिपून नंतर ‘गेट टुगेदर’चेही नियोजन केले होते. काही कुटुंब मतदान झाल्यावर लगेच आपापल्या कामाला विखुरली. कुटुंबातील प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे आणि हा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे, असा संदेश या मंडळींनी दिला.
एकाचवेळी मतदान करण्यासाठी आग्रही
सातारा रस्त्यावर राहणारे शहा यांच्या एकत्र कुटुंबाने मतदानाचे कर्तव्य एकत्र बजावले. मार्केट यार्ड येथील मतदान केंद्रावर शहा कुटुंबातील दोन भाऊ, सुना आणि मुले असे नऊ जण एकत्र आले होते. ‘यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही घरातील वीस सदस्य एकत्र आलो होतो. कुटुंबातील काही सदस्य आता परदेशात वास्तव्यास असून, चार जणांची नावे मतदारयादीत गहाळ झाल्याने आमचा एकत्र मतदान करण्याचा पायंडा मोडला; पण ज्यांची नावे आहेत, त्या सगळ्यांनी एकाचवेळी जाऊन मतदान करण्याबद्दल आम्ही आग्रही होतो,’ असे प्रकाश शहा यांनी सांगितले.
प्रत्येक निवडणुकीत आवर्जून एकत्रित मतदान
बिबवेवाडी भागात वास्तव्यास असलेल्या मुंदडा कुटुंबीयांनीही एकत्र मतदान केले. मोहिनी पुखराज मुंदडा यांची मधुसूदन, द्वारका, पंकज ही तीन मुले, सुना आणि नातवंडे या तीन पिढ्यांनी एकत्र मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले. ‘लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी मतदानाचा मोठा अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिला आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायला हवे, याबाबत आमचे कुटुंब आग्रही आहे. प्रत्येक निवडणुकीला आम्ही आवर्जून एकत्रित मतदान करतो,’ अशी माहिती द्वारकादास मुंदडा यांनी दिली.
एकत्र मतदान केल्याने लोकशाहीला फायदा
हडपसर येथील गोंधळेनगर भागात राहणाऱ्या रणनवरे आणि बाठे कुटुंबातील ५८ सदस्यांनी सोमवारी एकत्र मतदान केले. कुटुंबप्रमुख वडील, सख्खी, चुलत आठ भावंड, बहिणी आणि नवीन मतदार झालेली नातवंडे असा रणनवरे यांचा ४२ जणांचा, तर बाठे यांचा १६ जणांचा मोठा परिवार मतदानासाठी एकत्र आला होता. ‘आम्ही सगळे गोंधळेनगर भागात राहतो. गेल्या वेळीदेखील लोकसभा निवडणुकीला आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान केले होते. विशेष म्हणजे आमचे सगळ्यांचे एकाच केंद्रात नाव होते, केवळ खोल्या वेगवेगळ्या होत्या. सर्वांनी एकत्र मतदान केल्याने लोकशाहीला फायदा होईल असा संदेश या निमित्ताने नागरिकांना दिला,’ अशी माहिती प्रमोद जयसिंगराव रणनवरे यांनी दिली