रुग्णालयात नातेवाइकांचा टाहो
होर्डिंग पडल्यावर त्याखाली जमलेल्या अनेक जखमींना तसेच प्रत्यक्षदर्शीनी पालिका नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिस यांच्याकडे संपर्क केला. काही जखमींना तर नातेवाइकांनादेखील घटनेची माहिती दिली. नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जखमींना राजावाडी तसेच इतर रुग्णालयात नेण्यात आले होते. चिंतातूर झालेले नातेवाईक रुग्णालयाकडे धावले. रुग्णाची विचारपूस करून नातेवाइकांनी त्यांना दाखल करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये धाव घेतली. मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातच टाहो फोडला. राजावाडी रुग्णालयातील दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
कुटुंबाचा आधार गेला
डिलिव्हरीचे काम करणारा भरत राठोड (२२) हा घरामध्ये कर्ता होता. तो पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेला होता. त्यादरम्यान होर्डिंग पडले आणि त्याचा मृत्य झाल्याचे त्याचा मित्र श्रीकांत तेलंगे याने सांगितले. आई करोनामध्ये गेल्यानंतर बहीण आणि भावाचा भरत हाच आधार होता. या दुर्घटनेत कुटुंबाने आधार गमावल्याचे श्रीकांत म्हणाला.
‘थोडक्यात बचावलो’
सिद्धार्थ कॉलेजमध्ये अकरावीत शिकणारा शुभम गांगुर्डे हा त्याच्या मित्रासोबत पेट्रोल पंपावर गेला होता. मी थोडक्यात बचावलो असे राजावाडी रुग्णालयात उपचार घेणारा शुभम सांगत होता. अचानक वारा सुरू झाला. होर्डिंग जोरजोरात हलकावे खात होते. तेथून बाहेर पडण्याआधीच ते कोसळले. कमरेला, पाठीला जोरदार मार लागला. त्याच अवस्थेत कसाबसा रांगत बाहेर पडत असतानाच पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिल्याचे शुभम म्हणाला. शुभमचे वडील भिन्नमती असून आजीच्या पेन्शनवर घर चालते.
याआधीही गुन्हा दाखल
ज्या कंपनीचे होर्डिंग कोसळले त्या कंपनीविरुद्ध याआधीच पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीने रस्त्यावरून येणाऱ्यांना जाहिरात दिसावी यासाठी सुमारे अकरा मोठे वृक्ष विष टाकून सुकवले होते.