महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान मुंबईत हवामानात अचानक बदल झाला. मुंबईत धुळीच्या वादळासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळाला. २०२४ मध्ये मुंबईत हंगामातील पहिला पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कमालीचे तापमान वाढले होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास नागरिकांना अधिक सहन करावा लागला. मुंबईतील तापमान जवळपास ३५ अंशांवर पोहोचले होते. हवामान विभागाकडून मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरींचे पूर्वानुमान होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मुलुंड, भांडूप, अंधेरी तसेच दक्षिण मुंबईतील देखील काही भागांत पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे सीएसएमटी स्थानकाजवळील टाइम्स बिल्डिंगसमोरील झाड एका गाडीवर कोसळले.
मुंबईत धुळीचे वादळ, लोकांनी घाबरून जाऊ नये, आयएमडीतर्फे आवाहन
दुसरीकडे धुळीच्या वादळाचा परिणाम दीर्घ काळ टिकणार नाही, लोकांनी घाबरू नये, असे आवाहन आयएमडीतर्फे करण्यात आले आहे. वाऱ्यांचा वेग सोमवारी अधिक असेल, मंगळवारीही काही काळ याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आयएमडीतर्फे वर्तविण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी हलक्या सरींची उपस्थिती
मुंबई महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसत असून सोमवारी चौथ्या टप्प्यातील, मतदानादिवशीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभीजनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहिल्यादेवी नगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. यामधील पुणे, अहिल्यादेवी नगर येथे सोमवारी ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, जळगाव, बीड येथेही हलक्या सरींची उपस्थिती असेल.
वादळाची दीड तास अपेक्षा
मुंबई आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यांनी अक्षरशः नागरिकांची तारांबळ उडवली. मुंबई आणि परिसरात सुमारे दीड तास हा प्रकार सुरू राहण्याची अपेक्षा असल्याचे, मुंबई IMD चे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले.
सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्रात धुळीचे वादळ आणि पावसाच्या सरी कोसळल्या. सुरुवातीच्या धुळीच्या वादळानंतर ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली. मंत्रालयाजवळ धुळीचे वादळ धडकले आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या वेगामुळे झाडे ओव्हरहेड वायरीवर कोसळ्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा अधूनमधून थांबवण्यात येत होती.
सोमवार आणि मंगळवारीही पावसाची शक्यता
IMD ने 1600 वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार , पुढील ३ ते ४ तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते तीव्र पाऊस पडणार असून वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी असणार आहे. ठाणे आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात ही परिस्थिती उद्भविण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. IMD ने दिलेल्या इशाऱ्यानुसार काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी बाहेर जाताना खबरदारी घेण्याच्याही सूचना दिल्या आहे.. IMD च्या अंदाजानुसार गोव्यात आज आणि उद्या मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.