बांगलादेशातील कांदा निर्यात सुरळीत; नाशिकचे ७० ट्रक रवाना
नाशिक : बांगलादेशातील अराजकामुळे सीमेवर अडकून पडलेल्या नाशिकच्या कांद्याचे ७० पेक्षा अधिक ट्रक बांगलादेशच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, भारतातून बांगलादेशात बुधवारी ५९ ट्रक रवाना झाल्याची माहिती कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी दिली. नाशिकमधून बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या कांद्यापैकी आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक माल बांगलादेशात रवाना झाला आहे.बांगलादेशातील अराजकतेचा परिणाम भारतासारख्या शेजारी राष्ट्रांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून काही महिन्यांपासून रान पेटलेले असताना त्यात बांगलादेशातील अराजकाची भर पडून कांदा निर्यातदारांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, तेथील स्थिती वेगाने पूर्वपदावर येत असल्याने आगामी काळात बांगलादेशातील कांदा निर्यातीत अडसर येणार नाही, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

बांगलादेशमध्ये भारताकडून सुमारे ७५ टक्के कृषिमाल आयात केला जातो. दिवसाकाठी नाशिकमधून बांगलादेशात ७०हून अधिक ट्रक रवाना होतात. बांगलादेशातील अराजकतेमुळे दोन दिवसांपूर्वी हे ट्रक भारत-बांगलादेशाच्या सीमेवर अडकून पडले होते. ही स्थिती दीर्घकाळ राहिली असती तर कोलकत्यामध्येच मिळेल त्या दरात कांदा विकण्याची नामुष्की निर्यातदारांवर ओढावली असती. बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या ५० हजार टन कांद्यापैकी सुमारे ८५ टक्के माल एकट्या नाशिक जिल्ह्यातून पाठविण्यात येतो.
स्वाभिमानीचे पंतप्रधानांना पत्र
बांगलादेशातील अंतर्गत अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कांदा निर्यातदारांना व अप्रत्यक्षपणे कांदा उत्पादकांना बसणार आहे. या स्थितीत बांगलादेशातील काळजीवाहू सरकारशी समन्वय साधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारे पत्र स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.