उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. या ऋतूत लोकांना भरपूर आंबे खायला आवडतात. पिकलेले आंबे चवीला छान लागतात पण कच्चे आंबे अर्थात कैरीही चवीला अप्रतिम लागते. कैरी ही चवीला थोडी गोड आणि आंबट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कैरी ही एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही, जर तुम्ही तुमच्या आहाराचा भाग बनवला तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की कच्च्या आंब्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कैरी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कैरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. कैरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊया.
उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करा
उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे उष्माघात. तर यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कैरीचा समावेश करावा. कारण कैरी शरीराला थंडावा देते आणि डिहायड्रेशन टाळते. तसेच तुम्ही कैरीचे पन्हं देखील बनवून पिऊ शकता. गोड आणि आंबट असं पन्हं हे शरीराला आतून थंड ठेवतं आणि उष्माघातापासून वाचवतं. त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीरात पाण्याचे प्रमाण राखतात.
पचनासाठी उपयुक्त
कैरी पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. त्यात फायबर आणि पेक्टिन असते – जे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम देते. जेवणापूर्वी थोडाशी कैरी मीठ आणि काळी मिरी घालून खाल्ल्यास पचन सुधारते आणि भूकही वाढते.
यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करा
कैरी यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. हे यकृताला विषमुक्त करते आणि पित्त स्राव नियंत्रित करते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यकृताचे कार्य चांगले होते.
त्वचा आणि केसांसाठी
कैरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट-जीवनसत्त्वे त्वचा चमकदार आणि केस मजबूत बनवतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि केस गळण्याची समस्या कमी होते.
कैरी केवळ चवीलाच उत्तम नसून उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय देखील आहे. जर तुम्हालाही या उन्हाळ्यात निरोगी आणि फ्रेश राहायचे असेल तर तुमच्या आहारात कच्चा आंबा नक्कीच समाविष्ट करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)