लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागेल. संभाव्य निकालाची चर्चा भाजपमध्ये सुरु झाली असून नेमक्या काय चुका झाल्या त्याबद्दल आत्मचिंतन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा असल्यानं कोणताही उमेदवार दिला तरी निवडून येणारच हे गृहितक चुकीचं ठरणार नाही ना, अशी शंका भाजपला आहे. भाजप आणि शिंदेसेनेनं किमान ८ ते १० जागांवर वेगळे उमेदवार दिले असते, तर फायदा झाला असता असा एक मतप्रवाह महायुतीत आहे. ‘लोकमत’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सामान्य मतदारवर्गात नाराजी असलेल्या खासदारांनाच तिकीट दिल्याचा फटका विशेषत: विदर्भात बसू शकतो. वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदियात नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली असती, तर खासदारांबद्दलच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका टाळता आला असता, असं विदर्भातील पक्ष संघटनेत काम करणाऱ्या काहींनी सांगितलं. उमेदवारांबद्दल नाराजी असली तरीही मोदींची सुप्त लाट होती. त्याच लाटेच्या आधारे उमेदवार तरुन जातील. मतदारांनी मोदींकडे पाहून मतदान केलंय, असा दावा भाजपचे नेते करतात.
शिंदेसेनेला कुठे कुठे फटका?
शिंदेसेनेला बुलढाणा, दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डीमध्ये प्रामुख्यानं फटका बसू शकतो. बुलढाण्यात अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर किती मतं घेतात, त्यावर शिंदेसेनेच्या प्रतापराव जाधवांचा जय-पराजय अवलंबून आहे. दक्षिण मुंबईची जागा भाजपनं लढवली असती, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिलं असतं तर नक्कीच विजय मिळाला असता, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटतं. दक्षिण मुंबईत यामिनी जाधवांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊ शकतो.
महायुतीचे प्रयोग फसणार?
धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार गटाची, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देणं, रासपच्या महादेव जानकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीतून तिकीट देणं, शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना सेनेतून आयात करुन घड्याळावर उमेदवारी देणं हे प्रयोग यशस्वी होतील का, असे प्रश्न आता महायुतीच्या नेत्यांना पडले आहेत.
महायुती, मविआचे दावे काय?
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मराठा, मुस्लिम, दलित असं समीकरण महाविकास आघाडीसोबत होतं. तर विदर्भात दलित, मुस्लिम, कुणबी (डीएमके) मतदारांनी आपल्याला साथ दिली, असं मविआचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे मराठा आणि कुणबी समाज आमच्यासोबतही होता आणि लहान-मोठ्या अन्य जातींनीदेखील आम्हाला साथ दिली, असा दावा भाजपच्या नेत्यांचा आहे.