३१ वर्ष पोलिस दलात, सोहळ्यादिवशी रुग्णालयात, आयुक्तांनी दिली अधिकाऱ्याला हृदयस्पर्शी सेवानिवृत्ती

मुंबई : आयुक्तांच्या हस्ते निवृत्ती स्वीकारावी हे प्रत्येक पोलीसाचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वप्न असते. महादेव निंबाळकर यांनी ३१ वर्षे मुंबई पोलिस दलात कर्तव्य बजावले. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रकृतीने साथ दिली नाही आणि निंबाळकर हे रुग्णालयात दाखल झाले. याबाबत कळताच मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी थेट रुग्णालय गाठले. आयुक्तांना पाहून निंबाळकर यांना आश्चर्यचा धक्का बसला आणि त्यांच्या हस्ते मिळालेली हृदयस्पर्शी सेवानिवृत्ती पाहून ते भारावून गेले.

मुंबई पोलिस दलातील सुमारे २०० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी, ३१ मे रोजी निवृत्त झाले. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह पोलिस दलातील इतर अधिकारी उपस्थित होते. पोलिस आयुक्तांच्या हस्ते सेवानिवृत्ती स्वीकारावी असे प्रत्येकाला वाटत असल्याने निवृत्ती असलेले सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी कुटुंबीयांसह उपस्थित होते.
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, बोरीवलीत केबल तुटली, लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने

मोठ्या उत्साहात हा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव निंबाळकर हे हजर नसल्याचे कळले. सेवानिवृत्ती सोहळ्याला मुकल्याची सल निंबाळकर यांच्या मनाला लागून राहू नये, असा विचार करून विवेक फणसळकर यांनी निंबाळकर यांची भेट घेण्यासाठी ते दाखल असलेले रुग्णालय गाठले. सेवानिवृत्ती सोहळ्याला मुकल्याची हुरहूर लागलेल्या निंबाळकर यांना आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना समोर पाहून आनंद झाला.
Mumbai News : महापालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरूच राहणार, १,३३२ कामगारांचा सक्रीय सहभाग

सोहळ्याप्रमाणेच पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन फणसळकर यांनी निंबाळकर यांना पोलिस दलातून निवृत्ती देत त्यांना निरोगी, सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी निंबाळकर यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे रफी अहमद किडवाई मार्ग परिसरातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

काही तासांचे एसीपी

उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात भरती झालेल्या प्रत्येकाला आपण सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) होऊन निवृत्त व्हावे असे वाटत असते. परंतु प्रत्येकजण एसीपी होतो असे नाही. निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठ निरीक्षकावरून निंबाळकर यांना एसीपी पदावर बढती देण्यात आल्याचे गृहविभागाचे आदेश जारी करण्यात आले. निवृत्तीपूर्वी काही तास का होईना, निंबाळकर यांना एसीपी होता आले.