राज्यात १०८ हा फोन क्रमांक डायल केल्यावर रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत नागरिकांच्या सेवेत हजर होत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णवाहिका दिसेनाशा झाल्या होत्या. विधान परिषदेत आमदार प्रवीण दटके यांनी या रुग्णवाहिकेविषयी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मंत्री सावंत यांनी वस्तूस्थिती मांडली.
सावंत म्हणाले की, १०८च्या ९५७ रुग्णवाहिका राज्यभरात असून २०२३ मध्ये मेळघाट येथे मी अचानक भेट देऊन या रुग्णवाहिकांची अवस्था पाहिले. त्यानंतर काही ठिकाणी जाऊन या रुग्णवाहिकांचे लॉग बूक पाहिले, त्यात गैरप्रकार आढळून आले. अनेक रुग्णवाहिका ज्या एका ठिकाणाहून निघाल्याचे दिसून आले त्या सीसीटीव्हीमध्ये मात्र दिसून आल्या नाहीत. त्यामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली की या रुग्णवाहिकांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार.
सरकारने कंत्राटदाराला माहिती देण्यास सांगितले परंतु, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही. त्यानंतर या कंत्राटदाराला इतर राज्यात काळ्या यादीत टाकल्याचे लक्षात आले. त्यांना चौकशीसाठी स्मरणपत्रे देण्यात आली. त्यांना दोन वेळा मुदतवाढ दिली परंतु, आता मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे मी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना कळविले आहे की राज्याच्या १०२ वॉर रुमचा वापर करत या सर्व रुग्णवाहिका सरकार स्वतः चालवेल.
दरम्यान, सोमवारी विधान परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी रुग्णवाहिकेबाबत मोठी घोषणा केली. काही मिनिटांत रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल व्हावी हा उद्देश असताना या प्रकरणात कंत्राटदारांकडून गैरप्रकार होत असल्याचं म्हणत त्यांनी आता सरकारचं या सर्व अॅम्ब्युलेन्स चालवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.