ऑपेरा हाऊस परिसरात या हिरे व्यावसायिकाची अंकुर जैन नावाच्या व्यापाऱ्यासोबत ओळख झाली. अंकुर याने सोने आणि हिरे यांचे दागिने बनवून देण्याची ऑर्डर व्यावसायिकाला दिली. दागिन्यांच्या बदल्यात सुरुवातीला अंकुर याने नियमित पैसे दिले; मात्र नंतर दागिन्यांच्या बदल्यात तो सोन्याची लगड देऊ लागला. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत अंकुर याने सुमारे एक कोटीचे दागिने बनवून घेतले आणि त्या बदल्यात तितक्याच किमतीच्या सोन्याच्या लगडी दिल्या. पैसे देऊन या लगडी सोडवणार असल्याचे अंकुर याने सांगितले होते. व्यावसायिकाला पैशाची गरज असल्याने त्याने अंकुरशी संपर्क केला आणि पैशाची मागणी केली.
अंकुर याने पैसे देतो असे सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे व्यवसायिकाने सोन्याची लगड वितळवण्यास घेतली. त्यावेळी सर्व लगडी नकली असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे समोर येताच व्यावसायिकाने याबाबत दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली.