हा क्रूर गुन्हा, सज्ञान म्हणून कारवाई करा, देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना सूचना

प्रतिनिधी, पुणे : ‘कारचालक हा अल्पवयीन जरी असला, तरीही घडलेला अपघात हा क्रूर गुन्ह्याचाच प्रकार आहे. निर्भया खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कारचालकावर सज्ञान म्हणून कारवाई करा,’ अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनी विधिसंघर्षित मुलाला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली असल्यास संबंधितांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यासही त्यांनी बजावले.कल्याणीनगर येथे शनिवारी मध्यरात्री भरधाव आलिशान कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अटक केलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासांत जामीन मिळाला. जामीन देताना विधिसंघर्षित मुलाला काही अटी घालण्यात आल्या. त्यानंतर समाजमाध्यमातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. येरवडा पोलिस ठाण्याच्या आवारात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले, तर भारतीय जनता पक्षाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन आरोपी; तसेच पब चालकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, ‘कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात योग्य कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या आहेत. त्याबाबत पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. या प्रकरणातील अल्पवयीन चालकावर तो सज्ञान असल्याचे ग्राह्य धरून कारवाई करावी; तसेच मध्यरात्री उशिरापर्यंत पब खुला ठेऊन अल्पवयीन मुलांना मद्य देणाऱ्यांना सहआरोपी करण्याची सूचना केली आहे.’

येरवडा पोलिस ठाण्यातील दिवसभराचे सीसीटीव्ही फुटेज तपासून कोणाला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली आहे का, याची तपासणी करण्यासही फडणवीस यांनी सांगितले आहे.

‘… तर, पोलिसाचे निलंबन’

आरोपीला पोलिस ठाण्यात पिझ्झा, बर्गर दिल्याचा आरोप काही जणांनी केला आहे; तसेच वृत्तपत्रांतही त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याची चौकशी करण्यात येईल. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून, या प्रकरणी कारवाई करण्यात येईल. यात पोलिस ठाण्यातील कर्मचारी आढळून आले, तर त्यांच्यावर निलंबनाची करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

पबचालकावरही गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्याच्या ताब्यात कार दिल्याने त्याच्या वडिलांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८च्या कलम ३ आणि १९९अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुले मुंढवा परिसरातील दोन पबमध्ये गेली होती. तेथे त्यांना मद्य देण्यात आले. त्यामुळे पबचालक प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदिप सांगळे, जयेश बोनकर यांच्यावर अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुरुवातीला लावलेले ‘३०४ अ’ हे कलम बदलून ‘३०४’ हे कठोर कलम लावले आहे. पोलिसांनी किरकोळ कारवाई केली, असा कोणीही समज करून घेऊ नये.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त