हाय गर्मी! मुंबई पुन्हा तापली, आजही घामाच्या धारा, हवामान खात्याकडून मान्सूनबाबत मोठी अपडेट

प्रतिनिधी, मुंबई : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला कोकणातील तापमानाचा ताप या आठवड्यातही कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला आज, बुधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी सांगितले होते. मात्र मुंबईमध्ये सर्वसाधारण वातावरणाची शक्यता होती. हा इशारा अद्ययवात करून प्रादेशिक हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस उष्ण वातावरणाची शक्यता वर्तवली. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी बुधवार ते शुक्रवार या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.मुंबईतील कमाल तापमान सोमवारच्याच श्रेणीत नोंदले गेले. सांताक्रूझ येथे ३४.९, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान मंगळवारी नोंदले गेले. तसेच आर्द्रताही ७० टक्क्यांहून जास्त होती. परिणामी मुंबईकरांना सातत्याने वाढलेले तापमान आणि उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारसाठी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि आर्द्र हवेचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार या तीन दिवशी, नंदुरबार जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार, तर नाशिक जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.
प्रवाशांचं टेन्शन वाढणार, कोकणकन्या पनलेवहून सुटणार, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, वाचा सविस्तर

गुजरात आणि वायव्य महाराष्ट्राच्या वर एक प्रतिचक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर येणारे वारे, तसेच सध्याचे वायव्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्ंयामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरणामुळे अस्वस्थता जाणवू शकेल, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. सध्या तापमान खूप वाढलेले नाही. मात्र आता पावसाळा जवळ येत असल्याने हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता असल्याचेही त्या म्हणाल्या. या कालावधीत मुंबईची हवा दमट असते. या वातावरणाचा नागरिकांना त्रास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हलके आणि सुती कपडे, सैल कपडे घालणे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा इतर आच्छादन असणे आवश्यक आहे.

उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस

उर्वरित महाराष्ट्रात आज, बुधवारी हलका पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावू शकतो. अहिल्यादेवीनगर, पुणे, सातारा, जालना, बीड येथे हलक्या सरींची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.