जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर रविवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास बोपोडीत हा अपघात झाला. अपघातात कोळी यांना प्राण गमवावे लागले असून, त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ‘अपघातानंतर कारचालकाने गाडी थांबवून जखमींना मदत करण्याची भूमिका घेतली असती, तर कदाचित कोळी यांची जीव वाचला असता,’ अशी भावना पोलिसांतील त्यांचे सहकारी व्यक्त करीत आहेत.
दहा दिवसांपूर्वीच बदली
समाधान कोळी वाहतूक शाखेत नेमणुकीस होते. त्यांची दहा दिवसांपूर्वीच खडकी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावले होते.
‘फेरफटका’ मारणे भोवले
अपघातग्रस्त कारच्या चालकाने रात्री वेळी फेरफटका मारण्यासाठी मित्राकडून कार घेतली. त्याचा हा फेरफटका पोलिसाच्या जीवावर बेतला. दरम्यान, कल्याणीनगर येथील पोर्श अपघात आणि मुंबईतील वरळीत भरधाव कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना ताजी असताना, पुण्यात ‘हिट अँड रन’ची दुसरी घटना घडल्याने राज्यभर चर्चा होत आहे.
समाधान कोळी यांचा अपघात नेमका कसा झाला? वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात हिट अँड रनच्या आणखी एका केसमध्ये दाम्पत्याचा मृत्यू, सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा
अपघातापूर्वी हरवलेली मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन
पोलिस हवालदार समाधान कोळी आणि संजोग शिंदे यांनी अपघात होण्यापूर्वी हरवलेल्या मुलीची तिच्या आई-वडिलांशी भेट घडवून आणली. त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांचा अपघात झाला. कोळी आणि शिंदे गस्त घालत असताना खडकी भागातील बसथांब्यावर अकरा वर्षांची मुलगी त्यांना आढळली. त्यांनी मुलीकडून तिच्या आई-वडिलांचा मोबाइल नंबर घेतला. ती मुलगी पिंपळे सौदागर येथील होती. कोळी आणि शिंदे यांनी मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांना बोलावले. त्यानंतर खातरजमा करून मुलीला आई-वडिलांकडे सोपवले. त्याचा फोटो त्यांनी मध्यरात्री एक वाजून सात मिनिटांनी खडकी पोलिसांच्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपवर पोस्ट केला होता.