बुटांसाठीच्या निधीचीही प्रतीक्षा
‘ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही गणवेश पोहोचलेले नाहीत. कापडही आलेले नाही. त्याशिवाय ६ जुलै २०२३ रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना एक जोड बूट आणि दोन जोड पायमोजेही देणे आवश्यक होते. त्यासाठीचा निधी सरकार शाळांच्या खात्यांवर जमा करणार होते. मात्र, हा निधीही अद्याप पोहचलेला नाही’, अशी माहिती शिक्षक सेनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पाटोळे यांनी दिली.
शिलाई दर खूपच कमी
‘राज्य सरकार प्रत्येक गणवेशामागे ११० रुपये शिलाई दर देणार असून एक गणवेश शाळांना शिवून घ्यायचा आहे. मात्र प्रचलित बाजारभावापेक्षा हा दर खूप कमी असल्याने शाळांना सरकारने पाठवलेल्या कापडांचा गणवेश शिवून घेण्यात अडचणी येणार आहेत. त्यापेक्षा सरकारनेच दोन्ही गणवेश पाठवायला हवे होते’, अशी अपेक्षा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरिश ससणकर यांनी व्यक्त केली.
‘एक देश, एक गणवेश’ अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या बुटांचे तपशील प्रत्येक शाळेला पुरवले आहेत. तसेच प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेत बूट खरेदीसाठी आवश्यक निधीही वितरित करण्यात आला आहे. आता शाळांनी त्यांच्या पातळीवर बूट खरेदी करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. – प्रदीपकुमार डांगे, राज्य प्रकल्प संचालक, प्राथमिक शिक्षण परिषद
राज्य सरकारने गणवेश पुरवण्याची जबाबदारी घेण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे यातील अनेक गोष्टी आम्हालाही नव्या होत्या. गणवेशासाठी निश्चित केलेल्या कापडाची गुणवत्ता तपासणी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या समितीने केली. या तपासणीस थोडा विलंब झाल्याने गणवेश अद्याप पोहोचले नाहीत. या तपासणीतून विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम कापड आम्ही निवडले आहे. तसेच स्काऊट-गाइडच्या गणवेशाचा रंग गडद निळ्याऐवजी आकाशी निळा करण्याची चर्चा सुरू होती. पण दिल्लीत झालेल्या जांबोरीत गडद निळ्या रंगाबाबत एकमत झाले. हा निर्णय उशिराने आल्याने गणवेश तयार झाले नाहीत. पण आता १५ ऑगस्टपर्यंत सर्व शाळांमध्ये हे गणवेश पोहोचतील. – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री