‘राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून, हा ‘चुनावी जुमला’ निवडणुकीनंतर संपेल असा धादांत खोटा अपप्रचार केला जात आहे; परंतु हा ‘अजितदादाचा वादा’ असून, ही योजना सुरू ठेवायची असेल, तर महायुतीला निवडून द्यावे लागेल,’ असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरतर्फे केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृहात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. शहराध्यक्ष दीपक मानकर, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘पुणे व पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षात केवळ आंदोलने करून विकास होत नाही,’ असे सांगत अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीतील वादावरून विरोधकांवर ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करीत असल्याची टीका केली. ‘‘डीपीसी’च्या माध्यमातून तालुकानिहाय दिलेल्या निधीचा तपशील काढण्यास सांगितले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘विधानसभा निवडणूक ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज आहे. विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढताना लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांचे झालेले गैरसमज दूर करावे लागतील. केंद्रातील ‘एनडीए’च्या विचारांचे सरकार राज्यात आल्यास कोट्यवधी रुपयांचा निधी आणता येईल, त्यातून शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबविणार आहोत,’ असेही ते म्हणाले.
माझ्यासह सर्वांना नियम लागू
‘कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांची तीन ते चार तास पोलिस चौकशी झाली. त्या घटनेशी सुनील टिंगरे यांचा दुरान्वयेही संबंध नसताना, विनाकारम त्यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला,’ असेही अजित पवार म्हणाले. ‘पुण्याला बदनाम करणाऱ्या घटना गेल्या काही काळात घडल्या असून, अतिक्रमण व अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई केली जात आहे. सरकारी नियमावली ही अजित पवारांसह सर्वांना लागू असून, त्यामध्ये कोणताही भेदभाव नाही,’ असेही त्यांनी ठणकावले.
पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम
पुणे मेट्रो व रिंग रोडच्या कामाला गती दिली जात असल्याचे सांगतानाच, वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या सहनशीलतेला अजित पवारांनी सलाम केला. ‘पुणेकरांनी आणखी काही दिवस कळ काढावी, शहराच्या मूलभूत गरजा भागविणारी विकासकामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,’ असेही ते म्हणाले.