अकोल्यात मोठा फटका
अकोला लोकसभेची निवडणूक तिरंगी झाली होती. कारण भाजपकडे असलेल्या अकोल्याच्या जागेवरुन पक्षाने मावळते खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना रिंगणात उतरवलं होतं. तर त्यांच्यासमोर काँग्रेसच्या अभय पाटील यांचं आव्हान होतं. वंचितकडून खुद्द प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले होते. धोत्रेंनी 4,57,030 मतांसह विजय मिळवला, तर पाटील यांना 4,16,404 मतं मिळाली, तर आंबेडकरांना 2,76,747 मतं प्राप्त झाली. म्हणजेच वंचित मविआत सहभागी झाले असते, तर भाजपची ही जागा गेली असती.
वंचितचा तीन ठिकाणी ठाकरेंना फटका बसला. हातकणंगले मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचाही केवळ 13 हजार 426 मतांनी पराभव झाला. वंचितकडून डीसी पाटील यांना तिकीट मिळालं होतं, त्यांनी 32 हजार 696 मते कमवली. म्हणजेच ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजय नक्कीच मिळवता आला असता.
बुलढाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर पडले. त्यांचा 29 हजार 479 मतांनी पराभव झाला. तिथे शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनी पुन्हा मैदान मारलं. या ठिकाणी वंचितच्या वसंतराव मगर यांना 98 हजार 441 मतं मिळाली. वंचित महाविकास आघाडीत असती, तर ही लाखभर मतं त्यांच्याकडे जाऊन महायुतीला धक्का बसला असता.
मुंबईत निसटता पराभव
सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. तिथे वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांनी 10 हजार 52 मतं खालली. तर नोटाला 15 हजारांहून अधिक मतदारांनी निवडलं. वंचितच्या मविआ सहभागाने समीकरणं नक्कीच बदलली असती.
दुसरीकडे, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्ये शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे 1,34,650 मताधिक्याने विजयी झाले. त्यांना 4,76,130 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि एमआयएमचे मावळते खासदार इम्तियाज जलील यांना 3,41,480 मते मिळाली. 2019 मध्ये, वंचितने एमआयएमसोबत युती केली होती. त्यामुळे जलील यांनी औरंगाबादची जागा थोड्या फरकाने जिंकली होती. मात्र, यावेळी वंचितने अफसर खान यासीन यांना उभे केले, त्यांना 69,266 मते मिळाली. मात्र, सध्याच्या निवडणुकीच्या निकालावर याचा फारसा परिणाम झाला नाही.
दरम्यान, जळगाव, रावेर, रायगड, रत्नागिरी, कल्याण, मावळ, पुणे, पालघर, उत्तर मुंबई, सातारा या भागात विजयी उमेदवारांचं मताधिक्य इतकं जास्त आहे, की वंचितच्या उमेदवारांची मतं मिळूनही त्यांना विशेष फायदा झाला नसता.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
वंचितने नागपूर, कोल्हापूर, सांगली आणि बारामती या चार मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. यापैकी कोल्हापूर, सांगली आणि बारामतीत मविआ जिंकली, तर नागपुरात वंचितचा फारसा प्रभाव दिसला नाही.