बारामती लोकसभेची जागा लेकीसाठी सोडून शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया सुळे यांनी २००९मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढविली. पुढे २०१४मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेत भलेभल्यांना पराभव चाखावा लागला असताना सुळे यांनी ७० हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला होता. त्या पुढेही २०१९मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांच्या विरोधात विजय मिळवून बारामतीत पवारांचा वरचष्मा असल्याचे सिद्ध केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या गटनेत्या म्हणून त्यांच्यावर २०१८ आणि २०१९मध्ये जबाबदारी सोपविण्यात आली. सुळे यांनी ही जबाबदारीही चोख पार पाडली. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, शेती, महिला सुरक्षा, महागाई या विषयांशी निगडित समस्यांवर त्यांनी वेळोवेळी संसदेत भूमिका मांडली. रेंगाळलेल्या समस्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच लोकसभेत सुळे सलग दोन वर्षे संसद महारत्न पुरस्कार, सलग आठ वर्षे संसद विशिष्टरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय विविध पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.
राजकारणासह विविध संस्थांचेही प्रतिनिधित्व
राजकीय पातळीवर सक्रिय असतानाच त्यांनी विविध संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान, नेहरू सेंटर, ‘अॅग्रिकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट’वर त्या विश्वस्त म्हणून काम पाहतात. यशवंतराव चव्हाण सेंटर, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या कार्याध्यक्षा आहेत. ‘साहेबांची लेक’ ही ओळख अभिमानाने मिरवताना, सुप्रिया सुळे यांनी राजकीय क्षेत्रात स्वत:चीही वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून मिळालेला राजकीय वारसा अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.