सुपरहिट फॉर्म्युला मविआकडून रिपीट; विधानसभा जिंकण्यासाठी प्लान ठरला, महायुतीला पुन्हा धक्का?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. विधानसभेची निवडणूक ४ महिन्यांवर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत.

राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत सांगलीसह मुंबईतील दोन जागांवर महाविकास आघाडीत खटके उडाले. त्याचा फटका आघाडीला काही प्रमाणात बसला. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचं जागावाटप, उमेदवार निश्चिती बऱ्यापैकी आधी झाली. त्याचा फायदा आघाडीला निवडणुकीत झाला. उमेदवारांना प्रचारासाठी बराच वेळ मिळाला. महायुतीचं जागावाटप रखडलं. उमेदवारांची नावं निश्चित होण्यास बराच विलंब झाला. नाशिक, ठाणे, संभाजीनगरच्या जागांचा प्रश्न रखडला होता.
बारामतीला २ खासदार, दादांकडून कुटुंबाला झुकतं माप; सुनेत्रा पवार मागच्या दारानं संसदेत जाणार
लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी मविआ कामाला लागली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पुढील आठवड्यात बैठकीसाठी दिल्लीत बोलावलं आहे. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेऊन विधानसभेच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा होईल. काँग्रेसनं कोणत्या जागा लढवायलाच हव्यात, पक्षाची ताकद कुठे कुठे आहे, यावर बैठकीत उहापोह करण्यात येईल. सांगलीसारखा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काँग्रेस दक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत १३ जागा जिंकत काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरला आहे.
एका बाबूंचा शपथविधी, दुसरे बाबू गैरहजर; नितीश गेले कुणीकडे? किंगमेकरच्या अनुपस्थितीची चर्चा
‘लोकसभा निवडणुकीत आघाडीचं जागावाटप व्यवस्थित झालं. त्याचा फायदा आघाडीला निवडणुकीत झाला. आता विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करुन राज्यात सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लवकरच जागावाटपावर चर्चा होईल. आम्ही एकमतानं हा विषय मार्गी लावू,’ असं मविआच्या वरिष्ठ नेत्यानं इकॉनॉमिक टाईम्सला सांगितलं.

लोकसभेत ४८ पैकी ३० जागा जिंकून महाविकास आघाडीनं ताकद दाखवून दिली आहे. राज्यात मतदारांनी दिलेला कौल पाहता शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माघारी फिरु शकतात. दोन्ही पक्षांकडून आमदार संपर्कात असल्याचे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आमदारांची पक्षांतरं पाहायला मिळू शकतात.