राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या फेब्रुवारी २०२४ मध्ये राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभा निवडणूक होत असून त्यासाठी बुधवारी रात्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुरूवारी सकाळी सुनेत्रा पवार विधानभवनात आल्या आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मात्र, या प्रसंगी महायुतीतील एकही नेता उपस्थित नसणे यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकात रतन शारदा यांनी लिहिलेल्या लेखात अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाल्याची टीका करण्यात आली आहे. या लेखावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत असून पक्षाकडून पराभवाचे खापर राष्ट्रवादीच्या डोक्यावर फोडू नका, अशी तीव्र प्रतिक्रियाही देण्यात आली आहे. मात्र थेट संघानेच राष्ट्रवादीवर टीका केल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादीचे संबंध कितपत सौहार्दाचे राहतील याविषयी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत आघाडी राहील किंवा कसे याबाबत आज सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरताना भाजप व शिंदे यांच्या नेत्यांची उपस्थितीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रसंगी महायुतीतील भाजपसोबतच शिवसेना पक्षातीलही नेता उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादीपासून दोन्ही पक्ष अंतर राखून आहेत काय याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या जागेसाठी गुरुवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि पवार यांचा एकच अर्ज यासाठी दाखल करण्यात आला.