काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची दिल्लीत अखिलेश यादव सोबत भेट झाल्याची बातमी आली होती. यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंची राजकीय दृष्टीने बैठक महत्त्वपूर्ण असेल. आगामी राज्यातील विधानसभेच्या तोंडावर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंची भेट यामध्ये नक्कीच काही ना काही राजकीय गणित असेल.
तर मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी स्थानिक नेत्यांचा भेटीगाठी घेताना दिसतात पण काँग्रेसच्या मात्र कोणत्याही नेत्यांची भेट ममता बॅनर्जी यांनी अद्याप तरी घेतली नाही. लोकसभेच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रे चा नारा दिला होता, त्यामुळे इंडिया आघाडीपासून ममता बॅनर्जींचा दुरावा अशीच बातमी होती. आता पुन्हा इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांच्या भेटीगाठीचा सिलसिला ममता बॅनर्जी यांनी सुरु केला आहे.
सुत्रांनुसार, ममता बॅनर्जी उद्या शरद पवारांची भेट घेतील, लोकसभेचे बजेट सत्र यावर विरोधकांची काय रणनिती आहे याबद्दल बॅनर्जी चर्चा करु शकतात. शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर बैठक होईल अशी माहिती मिळते.तसेच दिल्लीत बजेट सत्रादरम्यान ममता बॅनर्जी जाणार आहेत, यावेळी त्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवले जाते.