सीएम पदावरुन विशाल पाटीलांचा मोठा दावा; विश्वजीत कदम म्हणाले ‘बातमी करु नका नाहीतर…’

सांगली, स्वप्निल एरंडोलीकर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना आणल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये लाडके आजोबा, लाडके आजी, लाडकी मुलगी अशा योजना आगामी काळात पहावयास मिळतील. पण या योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरत्याच आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. झोपलेलं सरकार लोकसभा निवडणुकीनंतर जागं होऊन योजना आणतंय. या योजनेचा सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असेल तर आमचा पाठिंबा आहे. पण योजनेतून जनतेची दिशाभूल होऊ नये, फसवणूक होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असल्याचे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीत आमदार जयंत असंगावकर यांनी आयोजित केलेल्या शाळांना प्रिंटर वाटप या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

दरम्यान याच कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांच्याकडून विश्वजीत कदम यांचा पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला, भावी मुख्यमंत्र्यांसह सांगलीचे पालकमंत्री असा देखील उल्लेख केला, यानंतर विशाल पाटलांच्या विधानावर याची बातमी करू नका नाहीतर सगळं जग राहिलं बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल असे म्हणत विश्वजीत कदम यांनी जिल्हास्तरीय राजकरणावर लक्ष वेधले.
Sanjay Raut : दीड हजारात मुख्यमंत्र्यांचं घर चालतं का? लाडक्या भावांप्रमाणे बहिणींनाही १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

सांगलीमध्ये शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये बोलत असताना खासदार विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांची ओळख करून देत असताना “आपल्या जिल्ह्याचे मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसेच मुख्यमंत्री व्हायला काय भविष्यवाणी लागत नाही. त्याला पंचांग वगैरे देखील बघावे लागत नाही” असे विधान केले आणि जमलेल्या साऱ्या कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.


तर याला उत्तर देताना विश्वजीत कदम यांनी देखील पाटलांच्या स्तुतीला उत्तर दिले, “बोलण्याच्या ओघांमध्ये खासदार विशाल पाटील यांनी माझा भावी मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला. परंतु याची कोणीही बातमी करू नका. याची बातमी केली तर सगळं जग राहील बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागते” असे म्हणत विश्वजीत कदम यांनी राजकीय टोला लगावला.