विशेष म्हणजे भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत, हे राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याला माहित नसल्याने संभ्रम वाढला होता. तब्बल तीन तासानंतर भुजबळ हे सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीबाबत माहिती दिली. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची भेट घ्यायला गेलो असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, या भेटीपूर्वी अजित पवारांशी काहीही चर्चा केली नव्हती. पण, शरद पवारांची भेट घ्यायला जाण्यापूर्वी एका नेत्याला सांगितलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
घरु निघण्यापूर्वी भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांना फोन
“घरुन निघताना प्रफुल्ल पटेलांसोबत चर्चा केली होती, त्यांना सांगितलं होतं की मी शरद पवारांना भेटायला जातो आहे, माझ्याकडील सर्व कागदपत्रही त्यांना देणार आहे. या विषयावर मी चर्चा करणार आहे, ते म्हणाले ठीक आहे जा”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“मी पवार साहेबांकडे सकाळी गेलो. त्यांची अपॉईन्मेंट घेतली नव्हती, ते घरी आहेत ते कळालं आणि सव्वा दहाला मी गेलो. तेव्हा ते झोपलेले होते, त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मी एक दीड तास थांबलो, त्यानंतर ते उठले आणि मला बोलावलं, ते बिछाण्यावरच झोपलेले होते, मी बाजुला खुर्ची ठेवून बसलो. त्यांना सांगितलं की मी, राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, एक मंत्री म्हणून पक्षीय भूमिका मांडण्यासाठी आलो नाही.”
“राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. राज्यातील काही जिल्ह्यांत फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीयेत. तर काही लोक ओबीसी, धनगर यांच्यासारख्या दुकानात जायला बघत नाहीत, अशी परिस्थिती आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून राज्यात शांतता निर्माण करण्याची तुमची जबाबदारी आहे, याची आठवण मी करुन दिली. ही भेट राजकीय नसून राज्यात सध्या राज्यात जी परिस्थिती उद्भवली आहे त्यावर होती”, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
त्यावर शरद पवार यांनी दोन दिवसांत मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करेन असं सांगितल्याचंही छगन भुजबळ म्हणाले