सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण; तीन लाख रुपयांत विक्री, पोलिसांकडून अपहरणकर्त्या दोघांना अटक

प्रतिनिधी, पुणे : दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकातून अपहरण केलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याची बंडगार्डन पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. बाळाचे अपहरण करून त्याची तीन लाख रुपयांत विक्री करण्यात आली होती. अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात मुले पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आई-वडिलांसोबत झोपलेल्या मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांची टोळी उघड केली आहे.

चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंड्डी (वय २४, रा. जंबगी, विजापूर) व सुभाष सताप्पा कांबळे (वय ५५, रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अपहरण झालेल्या श्रावण अजय तेलंग (वय ६) याची सुटका केली आहे. त्या चिमुकल्याची सुखरूप सुटका करून त्याला पुन्हा त्याच्या आई-वडिलांजवळ देण्यात पोलिसांना यश आले आहे. पुण्यात छोटी-मोठी कामे करून रेल्वे स्थानक आणि इतर भागांत टेहळणी करणारा या टोळीचा प्रमुख आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याने आणखीही काही मुले पळविल्याचा संशय आहे. ही कारवाई ‘परिमंडळ दोन’च्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदिपान पवार, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांच्या पथकाने केली. पोलिस आयुक्तांनी बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाला उत्कृष्ट तपास केल्याबाबत एक लाख रुपयांचे बक्षीस दिले.

आतड्यांना जन्मजात पीळ, वाराणसीतील चार वर्षीय मुलाच्या दुर्मिळ आजारावर पुण्यात यशस्वी उपचार

नेमका प्रकार काय?

तेलंग दाम्पत्य मूळचे यवतमाळचे आहे. ते पुण्यात नातेवाइकांना भेटायला आले होते; पण घटनेच्या दिवशी भेट न झाल्याने ते दाम्पत्य सहा महिन्यांच्या मुलासह पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले. मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान चोरट्याने मुलगा झोपेत असताना, त्याचे अपहरण केले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांत गुन्हा नोंद होता.

गुन्ह्याचा छडा लागला कसा?

बंडगार्डन पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात कारमधून मुलाचे अपहरण केल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारचा माग काढला असता, कार कर्नाटकातील विजापूर येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार चंद्रशेखरला विजापूरमधून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत अपहृत मूल सोलापूरमधील सुभाष कांबळे यांना तीन लाख रुपयांना विक्री केल्याचे समजले. पोलिसांनी सुभाषचा शोध सुरू केला. विजापूरमधील काही हॉटेलमध्ये पाहणी केली. त्या वेळी एका हॉटेलमधून सुभाषला पकडून मुलाला ताब्यात घेतले.