अल्पवयीन आरोपी मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मित्रांना ससून रुग्णालयात अपघाताच्या दिवशी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं. त्यावेळी तिघांचं रक्त तपासणीसाठी घेण्यात आलं. पण त्यांचे रक्तनमुने न देता त्यांच्या जागी अन्य तीन व्यक्तींच्या रक्ताचे नमुने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रक्ताचे नमुने अल्पवयीन मुलांचेच आहेत हे भासावं यासाठी ते तिघेजण आरोपींचा रक्तगट असलेल्या रक्त गटांचेच आहेत ना याची काळजी घेतली गेली.
रक्ताची चाचणी करताना रक्तगट एकच यावा याची काळजी घेण्यात आली. पण त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना पोलिसांनी दुसऱ्यांदा घेतला आणि त्याच्या डीएनए चाचणीसाठी औंध रस्त्यावरील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. ससूनमधील नमुना आणि औंध रुग्णालयात घेतलेला रक्ताचा नमुना एक नसल्याचं समोर आलं. डीएनए चाचणीमध्ये दोन्ही एक्स, एक्स क्रोमोसोम आल्यामुळे हा रक्ताचा नमुना महिलेचा असल्याचं उघडकीस आले. चौकशी समितीतही ही गोष्ट उघड झाली. ससूनमध्ये घेण्यात आलेले अन्य दोन रक्तनमुने पुरुषांचे होते.
ससूनमध्ये आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी आणण्यात आलं. त्यावेळी सोबत पाच जण होते. पैकी दोघे मुलाचे पालक होते. त्यांच्या सोबत एक महिला आणि दोन पुरुष होते. त्याच महिलेच्या रक्ताचे नमुने आरोपीच्या रक्ताच्या नमुनाच्या जागी घेण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. दुसरीकडे आरोपीची आई शिवानी अगरवाल एकाएकी गायब झाली आहे. ती शहरात नसल्याचं कळतं. तिचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.