समाजकारणात राजकारण आणू नये, त्यांना राजकारण करायचे असेल तर मी राजीनामा देतो; जरांगेंच्या आरोपाला लाड यांचे प्रत्युत्तर

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला रविवारी ही कायम राहिला. जरांगेंनी समाजकारणात राजकारण आणू नये विरोधकाची भूमिका घेऊ नये, त्यांना राजकारण करायचे असेल तर मी राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या, असे आव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी जरांगे पाटील यांना दिले. तर त्याचवेळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजना आणि इतर योजनांना जरांगेनी पाठिंबा दर्शविला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करीत वरील आव्हान केले आहे. यावेळी प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगेनी एका सहकाऱ्याला सोबत घेत आमदार व्हावे. विधान परिषदेत त्यांची भूमिका मांडावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करू. पण मी समाजकारण करणार, राजकारण करणार नाही आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करायची हे योग्य नाही. चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू. मराठा आरक्षणासाठी आम्ही नक्कीच तुमच्यामागे आहोत.
Vasant More : वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन, पक्षप्रवेशावेळीच उद्धव ठाकरेंकडून तात्यांना शिक्षा
काही मागण्या या न्यायिक बंधनात असतात. राज्य चालवताना १४ कोटी जनतेचे राज्य चालवायचे असते. त्यात सर्व समाज असतो ते मायबाप असतात, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये नमूद केले आहे. तर त्याचवेळी मला अनेक धमक्यांचे फोन आले परंतु मी तक्रार करत नाही. कदाचित जरांगेंना कुणीतरी चुकीचे सांगतोय अशीही पुस्ती लाड यांनी जोडली.
Eknath Shinde : संयम सुटत असेल मात्र तो राखा, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचं आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापल्याचंही पाहायला मिळत आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषणाला बसले आहेत. २० जुलैपासून जरांगे पाटील सरकारने धोका दिल्याची टीका करत आरक्षणाबाबत आम्ही ठाम असल्याचं म्हणत पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या नुकत्याच आलेल्या योजनांवरही टीका केली. त्यावरुनही प्रसाद लाड यांनी जरागेंनी या योजनांना पाठिंबा द्यावा असं म्हटलं आहे.