डीजेच्या ठणाणामुळे त्रास
काही ठरावीक गणेश मंडळे वगळता बहुतांश गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीमध्ये स्पीकरचा वापर करतात. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे आणि लेझर लाइटमुळे गेले दोन वर्षे अनेक ज्येष्ठ, महिला, लहान मुले यांना त्रास झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवापूर्वी दोन-तीन महिने शहराच्या विविध भागात सराव करणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या दणदणाटामुळेही परिसरातील नागरिकांना विविध स्वरूपाचा त्रास सहन करावा लागतो. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गेल्या वर्षी मिरवणुकीतील हे ‘डीजे’ स्तोम कमी करा, अशा स्वरूपात आग्रही भूमिका घेऊन त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांकडे लक्ष वेधले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या या आवाहनाला सर्वसामान्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. त्यामुळे यंदा उत्सवाला अजून दोन महिने बाकी असल्याने लोकप्रतिनिधी, पोलिस, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, सजग नागरिक या सर्वांनीच आत्तापासूनच एकत्र येऊन त्याबाबतचे नेमके धोरण काय असावे, हे वेळीच जाहीर करण्याची गरज आहे, अशी भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडली आहे. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
दहा दिवस संपूर्ण शहर वेठीस
गणेश मंडळांना खुश ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्यातून बंधनमुक्त गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यामुळे समस्त पुणेकर उत्सवकाळात वाहतूक कोंडी व प्रचंड ध्वनिप्रदूषणामुळे अक्षरशः हैराण होत आहेत. दहा दिवस संपूर्ण शहर वेठीस धरले जात आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील रहिवाशांना तर दोन दिवस घरात राहणेही अशक्य होत आहे. नुकताच पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाला. त्यात कोठेही ध्वनिप्रदूषण, धांगडधिंगा नव्हता. असे चित्र गणेशोत्सवात का दिसत नाही, असा सवाल ज्येष्ठ नागरिक विलास लेले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.
कायमस्वरूपी बंदीची मागणी
‘डीजे’ व लेझर लाइटचा वापर न करता सर्व सण, उत्सव साजरे होऊ शकतात. फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. स्पीकर्स व लेझर लाइटच्या दुष्परिणामांबाबत सार्वजनिक मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते व मंडळ प्रमुख यांचे डॉक्टर व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून योग्य प्रबोधन करावे आणि ‘डीजे’ व लेझर लाइटवर कायमस्वरूपी बंदी घालावी. काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका आहेत, याचाही आपण गांभीर्याने विचार करावा,’ असे लेले यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी निर्बंधमुक्त सण अशी घोषणा केली आणि अनेक मंडळांनी नियम धाब्यावर बसवून दोन वर्षे उत्सव साजरा केला. अनेक मंडळे राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने आता न्यायालयाने यावर ठोस निर्णय घ्यावा.
– नितीन गोडबोले, नागरिक
डीजेमुक्त सण साजरे करण्याची हीच वेळ आहे. नाही तर भावी पिढ्यांना ‘डीजे’ हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भागच वाटेल.
– हितेश शहा, नागरिक
‘महाराष्ट्र टाइम्स’कडे कळवा प्रतिक्रिया
शहरात होणारा लेझर लाइटचा वापर, स्पीकर आणि ढोल-ताशा पथकांचा दणदणाट या विषयी आपल्या प्रतिक्रिया matapune@timesofindia.com या इ-मेलवर आवर्जून पाठवा.