काय आहे प्रकरण?
एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या व सध्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी जामनेर येथे राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात दोन गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही धक्कादायक घटना गेल्या मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता घडली होती. प्रकाश गोविंदा कापडे (वय ३९ रा. गणपती नगर, जामनेर) असे मृत जवानाचे नाव आहे.
प्रकाश कापडे मागील १५ वर्षांपासून एसआरपीएफ जवान म्हणून मुंबई पोलिस विभागात कार्यरत होते. सहा महिन्यांपासून सचिन तेंडुलकर यांच्याकडे बॉडीगार्डचे ते काम पाहत होते. मतदानाकरिता जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जामनेरला सुट्टी असल्याने आले होते. दोन दिवसांपूर्वी ते परिवारासह शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. जामनेर येथील गणपती नगरात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी अशा परिवारासह राहत होते.
तीन दिवसांपासून प्रकाश कुटुंबासह हसतखेळ वावरत होते. आदल्या रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबातले सर्वजण झोपले. रात्री १.३० वाजता प्रकाश कापडे घराच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीत गेले. तिथे त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात दोन गाळ्या झाडून घेतल्या. आवाज झाल्यावर त्यांची आई आणि परिवार धावत आला. प्रकाश कापडे यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमध्ये दहा गोळ्या होत्या. त्यातील दोन गोळ्या फायर झाल्या.
प्रकाश कापडे यांची चार दिवसांची सुट्टी संपणार असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता ते मुंबईला जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली. कुठल्याही प्रकाराची चिंता नसताना त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न कुटुंबीय व नातेवाईकांनाही पडला होता. मात्र ऑनलाईन रमीच्या व्यसनातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.