मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शुक्रवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला श्रीकांत शिंदेंसह निवडून आलेले सातही खासदार उपस्थित होते. यावेळी शिंदेंच्या सुपुत्राला मोदी सरकारमध्ये स्थान मिळावं, अशी एकमुखी मागणी उर्वरित सहाही खासदारांनी केल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना शिंदेंनी पराभूत केलं. शिवसेनेने राज्यातील १५ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेचे एकूण सातच खासदार निवडून आले आहेत.
शिवसेनेच्या खासदारांमध्ये ज्येष्ठता क्रमानुसार बुलढाण्यातून निवडून आलेले प्रतापराव जाधव यांचा अव्वल क्रमांक लागतो. तर श्रीरंग बारणेही सिनिअर आहेत. याशिवाय महाराष्ट्रात मंत्रिपद भूषवणारे रवींद्र वायकर आणि संदिपान भुमरे, तसेच श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, नरेश म्हस्के यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात आता निर्णयाचा चेंडू आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा, असं एकनाथ शिंदे म्हणत. मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना मंत्रिमंडळात घेतल्यावरुन शिंदे टीकास्त्र सोडत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द आपल्याच लेकाला थेट मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवून ‘राजा का बेटा’ला राजा बनवण्याचा घाट घालणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.