मुंबई : राज्यातील पाचव्या टप्प्यातील आणि विशेषत: मुंबईतील मतदान सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिथे शिवसेनेची मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथ गतीने पार पडत असल्याचा आरोप केला होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दख घेऊन राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांवर मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तर काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी भाजपालाही लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या याच पत्रकार परिषदेवर आक्षेप घेऊन भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश
आशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. आचारसंहिता भंग झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.
उद्धव ठाकरे यांनी त्या पत्रकार परिषदेत काय म्हटले होते?
मुंबईतील मतदान केंद्रांवर मतदारांची खूप गर्दी आहे. मात्र, जिथे शिवसेनेची मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात असून त्याचा त्रास मतदारांना त्रास होतो आहे. पराभवाच्या भीतीने जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू असून निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. हे सगळे भाजपाच्या इशाऱ्यावर सुरू आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.