मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथील राहणारे प्रगतशील शेतकरी संदीप सोरटे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. गेल्या 29 वर्षपासून ही म्हैस या शेतकऱ्याने पाळली होती. तिच्या जन्मापासून सांभाळलेल्या या म्हशीला शेवटपर्यंत सांभाळायचं हा त्यांचा मानस होता. मात्र मध्येच त्यांच्या वडिलांनी ही म्हैस विकली, मात्र संदीप यांनी ती पुन्हा विकत घेऊन परत घरी आणली.
साधारण २५ डिसेंबर २०२१ रोजी या म्हशीचे निधन झाले. तिच्या निधनंतर संदीप सोरटे यांनी तिचे सर्व विधी पार पाडले. आपण या मुक्या जिवासाठी काही तरी देणे लागतो. या भावनेतून संदीप सोरटे यांनी म्हशीची आठवणं म्हणून त्या म्हशिचे 45 हजार रुपये खर्च करून पेंटिंग बनवून घेतले. या म्हशीमुळे आपल्या व्यवसायात खूप प्रगती झाल्याचे संदीप सोरटे यांनी सांगितले.
याबाबत “मटा ऑनलाइन”शी बोलताना संदीप सोरटे यांनी सांगितले की, खरं तर आपली जनावरे ही आपल्या कुटुंबाचा एक भाग असतात. त्यांच्या बद्दल आपल्या मनात नेहमी आदराची भावना असायला हवी. या म्हशीमुळे मला माझ्या व्यवसायात मोठी प्रगती झाली आहे. तिच्या आठवणीत मी ही पेंटिंग तयार केली आहे. आजही मी या फोटोला वंदन करूनच कामाला सुरुवात करतो असल्याचे सोरटे यांनी सांगितले.
शेतकऱ्याने पळालेली सर्वच जनांवरे ही शेतकऱ्याला फायदा देणारी असतात. आयुष्यभर तो मुका जीव शेतकऱ्याला फायदा करून देण्याचे काम करत असतो. या म्हशी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संदीप सोरटे यांनी हे पेंटिंग बनवले आहे. या पेंटगची पंचक्रीशीत चर्चा आहे.