शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला? कुणी केला? १२ मतांच्या चार शक्यता

मुंबई : विधान परिषदेचे ज्येष्ठ नेते तथा चार वेळा आमदार राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत प्रभाकर पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. अखेपर्यंत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस बघायला मिळाली. परंतु दुसऱ्या क्रमाकांच्या पसंती फेरीत नार्वेकर यांनी बाजी मारल्याने जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसची मते फुटल्याने जयंत पाटील यांना केवळ १२ मतेच मिळाली.

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे १२ मते होती. तसेच काँग्रेस, शेकाप आणि माकप यांच्या मदतीने जयंत पाटील यांचे विधान परिषदेत पाचव्यांदा जाण्याचे स्वप्न होते. मात्र जयंत पाटील यांच्यासाठी आखलेली निवडणूकपूर्व रणनीती फेल झाली. काँग्रेसने मला मदतच केली नाही, असा उघड आरोप जयंत पाटील यांनी निकालानंतर केला. मला माझी हक्काची १२ मतेच मिळाली, असे सांगत आपली जाहीर नाराजी व्यक्त करून तातडीने अलिबागला निघून गेले.

जयंत पाटील यांना काँग्रेसची मते तर मिळालीच नाहीत परंतु जाहीर झालेल्या निकालांतून शरद पवार गट, माकप किंवा शेकाप यांची मते फुटल्याची शक्यता आहे. त्यांना मिळालेल्या मतांच्या आधारे त्यांच्या पराजयाच्या चार शक्यता लावता येतील तसेच कुणाची मते फुटली, याच्या शक्यता सांगता येतील.

जयंत पाटील यांच्या १२ मतांच्या चार शक्यता, कुणाची मते फुटली?

शरद पवार गट १० शेकाप १ माकप १ = १२ मतं (शरद पवारांची दोन मते फुटले)
शरद पवार गट १२ मते, शेकाप ० आणि माकप ० = ( शेकाप आणि माकप मते फुटली)
शरद पवार गट ११ मते, शेकाप १ आणि माकप ० = (माकपचे एक मत फुटले)
शरद पवार गट ११ मते, शेकाप ० आणि माकप १ = (शेकापचे एक मत जयंत पाटील यांना मिळालं नाही)